लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीवर पाणीटंचाईचे संकट!


उद्योगांच्या उत्पादनासह रोजगारावर परिणाम होण्याची भीती; कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनची एमआयडीसीकडे मागणी


खेड : लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीतील पाणीपुरवठ्याच्या अनिश्चिततेमुळे उद्योजकांची चिंता वाढली आहे. पावसाचे अनियमित आगमन आणि उपलब्ध जलसाठ्यावरील वाढता ताण लक्षात घेता भविष्यात पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर औद्योगिक वसाहतीला नियमित आणि शाश्वत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी केली आहे. शेलारवाडी धरणातून पाणी उपलब्ध करणे, वाशिष्ठी नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधणे आणि कोळकेवाडी धरणातून थेट पाणीपुरवठा करणे, असे विविध पर्याय असोसिएशनने सुचविले आहेत.
लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीसह परिसरातील गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी कोयना जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मितीनंतर सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा उपयोग केला जातो. हे पाणी वाशिष्ठी नदीत आल्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून वालोपे येथील पंपिंग स्टेशनवरून उपसा करून लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीतील जलशुद्धीकरण प्रकल्पात आणले जाते. येथे पाण्यावर प्रक्रिया करून ते औद्योगिक वसाहतीसह परिसरातील गावांना पुरविले जाते.
मात्र, या पाणीपुरवठ्याचे नियोजन कोयना प्रकल्पातून उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर अवलंबून असल्याने पाणी उपलब्धतेबाबत अनिश्चितता कायम आहे. उद्योगांसाठी पाणी हा अत्यावश्यक घटक असल्यामुळे पुरवठ्यात खंड पडल्यास उत्पादन प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. त्याचा फटका औद्योगिक उलाढाल, स्थानिक रोजगार आणि परिसरातील अर्थव्यवस्थेला बसण्याची शक्यता आहे.
संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहमुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतली. या बैठकीत औद्योगिक वसाहतीचा पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली.
यामध्ये शेलारवाडी धरणातून पाणी उपलब्ध करून घेणे, वाशिष्ठी नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधणे आणि कोळकेवाडी धरणातून लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीला थेट पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे, असे पर्याय मांडण्यात आले.
कोळकेवाडी धरणातून गुरुत्वाकर्षणाच्या साहाय्याने पाइपलाइनद्वारे पाणी थेट वालोपे येथील उदंचन पंपापर्यंत आणण्याचा पर्यायही असोसिएशनने सुचविला आहे. या पर्यायाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासून योग्य नियोजन केल्यास पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यास मदत होऊ शकते, अशी भूमिका उद्योजक संघटनेने मांडली.
त्याचबरोबर कोयना धरणातील पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करणे आणि औद्योगिक वसाहतीसाठी पर्यायी जलस्रोत विकसित करणे आवश्यक असल्याचेही अधोरेखित करण्यात आले. केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर अवलंबून न राहता भविष्यातील पाणीटंचाईचा विचार करून दीर्घकालीन योजना आखण्याची गरज उद्योजकांनी व्यक्त केली.
लोटे-परशुराम औद्योगिक वसाहत ही कोकणातील महत्त्वाच्या औद्योगिक केंद्रांपैकी एक असून, परिसरातील रोजगारनिर्मिती आणि आर्थिक उलाढालीत तिचे मोठे योगदान आहे. या औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध न झाल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यातून कामगारांच्या रोजगारावर, स्थानिक बाजारपेठेतील व्यवहारांवर आणि परिसराच्या आर्थिक विकासावरही विपरीत परिणाम होऊ शकतो.
त्यामुळे एमआयडीसी आणि शासनाने सुचविलेल्या सर्व पर्यायांचा गांभीर्याने विचार करून तांत्रिक व्यवहार्यता तपासावी आणि आवश्यक निधी व प्रशासकीय मंजुरीच्या दृष्टीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली.
या बैठकीला एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता सतीश पवार, विद्युत व यांत्रिकी विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रेरणा नागवेकर, उपअभियंता किशोर हळदणकर, विद्युत व यांत्रिकी विभागाचे उपअभियंता ज्ञानदेव सोनवणे, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता विपुल खोत, उपअभियंता संदीप पवार, आर. एस. पिंपळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राज आंब्रे, सचिव राजकुमार जैन, संचालक डॉ. प्रशांत पटवर्धन, विश्वास जोशी, राजेश तिवारी आणि मंदार आडीवरेकर यांच्यासह विविध उद्योगांचे प्रतिनिधी व व्यवस्थापकही बैठकीला उपस्थित होते.
औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी नियमित पाणीपुरवठा ही मूलभूत गरज आहे. त्यामुळे लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीच्या भविष्यातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी एमआयडीसी आणि शासन कोणती ठोस पावले उचलणार, याकडे आता उद्योजकांसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button