
पडद्यामागून आणखी एक षडयंत्र, भाजपा-शिंदेसेनेला घेरलं; मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा खळबळजनक दावा!
छत्रपती संभाजीनगर : सत्तेत राहण्यासाठी सत्य दाबले जात आहे. २ दिवस एकमेकांवर आरोप करणारे आता गप्प बसले आहेत. आरोप प्रत्यारोप बंद करा अशा सूचना आल्या. ही क्लिप खरी आहे हे सिद्ध झाले आहे.
केवळ सत्ता भोगायची आहे. आमच्या समाजाचा माणूस मोठा झाला पाहिजे यासाठी जीवाचं रान केले. आज त्याच माणसाकडून आम्हाला त्रास व्हावा. ही किती मोठी शोकांतिका आहे. आम्ही काय पाप केले? माझ्याविरोधात षडयंत्र रचले जातंय असं सांगत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा भाजपा-शिंदेसेनेवर घणाघात केला.
मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले की, माझ्या कानावर काही कुजबूज आली आहे. पडद्यामागे आणखी प्लॅनिंग सुरू आहे. ही क्लिप काही करून खोटी ठरवायची यासाठी धावाधाव सुरू आहे. प्रकरण उघडं पडल्यापासून या लोकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. ही क्लिप खोटी ठरवण्यासाठी प्लॅनिंग सुरू झाली आहे. पैसे कुठून आणले, का आणले यासारखे अनेक प्रश्न सरकारसमोर उभे राहणार आहेत. त्यामुळे ही क्लिप खोटी ठरवण्याचं काम पडद्यामागून सुरू झालंय. माझ्याकडे पुरावे येतील. खूप मोठे षडयंत्र राज्यासमोर येईल त्यामुळे नॅरेटिव्ह सेट करून, वातावरण निर्मिती करून ही क्लिप बदनाम करण्यासाठी, खोटी ठरवण्यासाठी प्लॅनिंग सुरू आहे असा आरोप त्यांनी केला.
तसेच पडद्यामागचे गुपित राज्यासमोर येऊ नये. त्यामुळे प्रचंड धावाधाव सुरू आहे. दिल्लीच्या वाऱ्या करणे सुरू आहे. ही क्लिप खोटी ठरवावी लागणार आहे अशी कुजबूज आहे. पैसे मिळाले नाहीत मग माझ्या मुलाबद्दल संभाषणात उल्लेख का आला असा प्रश्न शिंदे विचारणार आहे. पैसे कुठून आणले होते. कुणाला द्यायचे होते हे प्रश्न भाजपासमोर उभे राहणार आहेत. हे सत्य आहे. लबाडी नाही. फडणवीस-शिंदे या प्रकरणाच्या मुळाशी जातील असा विश्वास आहे. सत्य समोर आणायला हवे. भाजपाचे लोक असले तरी मी सोडले नाहीत असा संदेश फडणवीसांनी द्यावा. कितीही खोटं ठरवले तरी जे सत्य आहे ते कायम जगासमोर आणणार आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, मी या लोकांचे पितळ उघडे पाडले आहे. हे खूप मोठे षडयंत्र आहे. यंत्रणेवर या लोकांचा विश्वास नाही का? तपासाआधीच एआय निर्मित क्लिप असल्याचं काही जण सांगतात. परंतु ही खरी क्लिप आहे. ज्याच्या जिव्हारी लागले त्याने आरोप करायचे नाही का? आधी शिवसेना-भाजपा नेते एकमेकांना बोलत होती मग एकाएकी समझौता कसा केला? आता एकमेकांवर आरोप करायचे नाही हे ठरले आहे. या लोकांना सत्य दाबून ठेवायचे आहे असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.




