
मुंबई गोवा महामार्गावरील अंजणारी रास्ता रोकोप्रकरणी ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांसह १२० जणांवर गुन्हा दाखल !
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजा अंजणारी येथे करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनाचे पडसाद आता पोलीस कारवाईच्या रूपाने उमटले आहेत. प्रशासनाचा मनाई आदेश आणि पोलिसांनी बजावलेली कायदेशीर नोटीस धुडकावून महामार्गावरील वाहतूक रोखल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख दत्तात्रय कदम यांच्यासह सात प्रमुख पदाधिकारी आणि सुमारे १०० ते १२० कार्यकर्त्यांविरोधात लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अंजणारीतील आंदोलनानंतर राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे.
२५ नोव्हेंबर रोजी दुपारी लांजा तालुक्यातील अंजणारी बसस्थानक परिसरात मुंबई-गोवा महामार्गावर हे आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यात अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांचा मनाई आदेश लागू असताना आंदोलकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. विशेष म्हणजे, आंदोलनापूर्वीच लांजा पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६८ अन्वये कायदेशीर नोटीस बजावली होती. मात्र, या नोटिशीकडे दुर्लक्ष करून आंदोलकांनी महामार्गावर ठिय्या मांडला.
आंदोलकांनी महामार्गाच्या दोन्ही बाजूंना एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली आणि रास्ता रोको केला. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला. वाहनांच्या रांगा लागून प्रवासी आणि वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला. प्रशासकीय आदेश आणि पोलिसांच्या सूचनेनंतरही आंदोलन सुरू ठेवल्याने अखेर पोलिसांनी कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला.
लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल नितेश नवनाथ राणे यांनी याप्रकरणी फिर्याद दि त्यानुसार २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.०३ वाजता गुन्हा रजिस्टर क्रमांक ३११/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.यामध्ये दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख दत्तात्रय जयराम कदम, उपजिल्हाप्रमुख रविंद्र डोळस, लांजा तालुकाप्रमुख मारुती हांदे, संगमेश्वर तालुकाप्रमुख नंदादीप ऊर्फ बंड्या बोरुकर, रत्नागिरी शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, लांजा उपशहरप्रमुख प्रकाश ऊर्फ बाबू गुरव आणि युवा सेना लांजा तालुका अधिकारी अभिजीत राजेशिर्के यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
संबंधितांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ (अ) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचा भंग, पोलिसांच्या कायदेशीर नोटिशीचे उल्लंघन आणि सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.अंजणारी येथील रास्ता रोको आंदोलनानंतर आता पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.




