
उपजिल्हा रूग्णालय दापोलीच्या आवारात बांधकाम सुरू असताना इमारतीवरून पडून कामगार जखमी

दापोलीः- दापोली येथील उपजिल्हा रूग्णालयाच्या आवारात सुरू असलेल्या नवीन रूग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामादरम्यान एक कामगार इमारतीवरून खाली पडून जखमी झाल्याची घटना बुधवार दि. 25 नोव्हेंबर रोजी घडली.
हरीश गोविंद वडर (वय अंदाजे20 वर्षे) असे जखमी कामगाराचे नाव आहे. बुधवारी सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास बांधकामावर काम करत असताना अचानक तो इमारतीवरून खाली पडला. या घटनेत त्याला दुखापत झाली असून, तातडीने उपचारासाठी दापोली उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेच्या निमित्ताने बांधकामाच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे उंच इमारतींवर काम करताना कामगारांना आवश्यक सुरक्षा साधने, सेफ्टी बेल्ट, हेल्मेट, सुरक्षितता दौर तसेच इतर संरक्षक साहित्य उपलब्ध करून देणे ही संबंधित ठेकेदाराची महत्त्वाची जबाबदारी आहे. त्याचबरोबर कामगारांनीही स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेऊन आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर करूनच काम करणे गरजेचे आहे.
बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन झाले, तर अशा दुर्घटना टाळता येउ शकतात. ठेकेदार आणि कामगार या दोघांनीही सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन आपले जीवन सुरक्षित ठेवावे, हीच या घटनेतून अपेक्षा व्यक्त होत आहे.
फोटो डिपी 25-01 उपजिल्हा रूग्णालयाच्या नव्या इमारतीवरून पडून जखमी झालेला कामगार




