
अभिजीत दिपकेंचं विमान दिल्लीत लँड झालं, पण दिल्ली पोलीस डायरेक्ट विमानात घुसले अन्… दिपके पोलिसांच्या ताब्यात
केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात दिल्लीत आंदोलनासाठी येत असलेले कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.
काहीवेळापूर्वीच अभिजीत दिपके यांचे विमान दिल्ली विमानतळावर उतरले. त्यापूर्वी दिल्ली पोलिसांची मोठा फौजफाटा विमानतळावर दाखल होत त्यांनी परिसराचा ताबा घेतला. अभिजीत दिपके यांची समजूत काढून त्यांना आंदोलनापासून परावृत्त करण्याचा दिल्ली पोलिसांचा प्रयत्न होता. मात्र, अभिजीत दिपके आंदोलनावर ठाम राहिल्यानं दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतले. दिल्ली पोलिसांचे (Delhi Police) एक पथक अभिजीत दिपके असलेल्या विमानात दाखल झाले आहे. आता त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस पुढे काय करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
दिल्लीत आज 10 ऑक्टोबर 2026 रोजी कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलनाची हाक देण्यात आली होती. तसेच, जास्तीत जास्त नागरिकांना या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलेलं. याच पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस अलर्ट मोडवर असून आदल्या दिवसापासूनच आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केलेली. अशातच, दिल्लीला जाण्यावर ठाम असलेले कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक सकाळीच मुंबईहून दिल्लीला रवाना झाले. पण, दिल्ली विमानतळावर पाय ठेवण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विमानातूनच ताब्यात घेण्यात आलं आहे. अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली पोलिसांनी विमान दिल्ली विमानतळावर लँड होताच, विमानातूनच ताब्यात घेतलं आहे.




