
पुण्यात अनधिकृत फलकावर फोटो, नावे असल्यास नेते, पदाधिकाऱ्यांवर होणार ‘एफआयआर’!

पुणे : महापालिकेची परवानगी न घेता अनधिकृत जाहिराती लावणाऱ्यांबरोबरच संबधित फलकांवर ज्यांचे नाव, छायाचित्र किंवा इतर माहिती आहे, त्यांच्याहीविरोधात थेट फौजदारी गुन्हे आता दाखल करण्यात येणार आहेत.
विशेष म्हणजे, असे जाहिरात फलक हटविण्यापूर्वी त्याची कोणतीही स्वतंत्र पूर्वसूचना दिली जाणार नाही. जाहिराती काढण्याचा संपूर्ण खर्चही संबंधितांकडून वसूल केला जाणार आहे.
शहरातील दुकानांच्या ‘फ्रंट’ आणि ‘साईड मार्जिन’मध्ये बांधकाम करून अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश गेल्या आठवड्यात महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले. त्यानंतर महापालिका प्रशासनाने जोरदार कारवाई सुरू केली. याबरोबरच शहरातील चौक, रस्ते, फूटपाथ, उड्डाणपूल, विद्युत खांब आणि सार्वजनिक मालमत्तांवर बेकायदा जाहिरात फलक, फ्लेक्स, लावून शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्यांविरोधात महापालिका प्रशासनाने मोहीम उघडली आहे.
‘महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने या बाबत जाहीर निवेदन प्रसिद्ध केले. सर्व नागरिक, राजकीय पक्ष, सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक संस्था, मंडळे, जाहिरातदार, जाहिरात संस्था, मुद्रक आणि कार्यक्रम आयोजकांना याद्वारे बेकायदा जाहिरात फलक न लावण्याचे आवाहन केले आहे.
महापालिकेच्या हद्दीतील सार्वजनिक रस्ते, पदपथ, चौक, दुभाजक, विद्युत खांब, झाडे, पूल, भिंती अथवा कोणत्याही सार्वजनिक अथवा खासगी मालमत्तेवर जाहिरातींचे फलक, फ्लेक्स, कमानी लावण्यासाठी महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे. याकडे दुर्लक्ष करणे महागात पडणार असून, बेकायदा जाहिरात फलक लावल्यास तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास, दोन हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात,’ असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
फलकांवरील व्यक्तीदेखील जबाबदार
‘अनधिकृत फलकांवर आणि बॅनरवर ज्यांची नावे, छायाचित्रे अथवा पदनामे प्रसिद्ध करण्यात आली आहेत, अशा व्यक्तींविरोधातही फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने एका निकालात दिले आहेत. याचा आधार घेऊन प्रशासनाने ही कारवाई करण्याचे ठरविले आहे. जागोजागी वाढदिवस, राजकीय कार्यक्रम, नियुक्त्या, शुभेच्छा किंवा स्वागताच्या निमित्ताने झळकणाऱ्या जाहिरात फलकांवरील नेते आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना त्यांची जबाबदारी टाळता येणार नाही,’ असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
‘एफआयआर’ दाखल करून खर्च वसूल करणार
बेकायदा जाहिराती आढळल्यास त्यावर कारवाई केली जाणार आहे. यासाठी महापालिकेचा झालेला संपूर्ण खर्च संबंधितांकडून वसूल केला जाणार आहे. तसेच, जाहिरात उभारणारी व्यक्ती, जाहिरातीवर नाव किंवा छायाचित्र असलेली व्यक्ती, संबंधित मुद्रक व जाहिरात संस्था आणि कार्यक्रमाचे आयोजक अशा चार घटकांविरोधात प्रथम खबर अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात येणार आहे. तसेच, जाहिरात शुल्क आणि दंडात्मक कारवाईदेखील होणार आहे.
पुणे महापालिकेकडून पहिल्या चुकीला समज, नंतर टप्प्याटप्प्याने लाखांचा दंड!
मुद्रकांवरही जबाबदारी
‘शहरात लावण्यात येणाऱ्या जाहिरात फलकावर, फ्लेक्सवर मुद्रकाचे नाव, पत्ता आणि ज्यांच्या सांगण्यावरून छपाई करण्यात आली आहे, त्यांची माहिती नमूद करणे बंधनकारक आहे. ही माहिती नसल्यास संबंधित मुद्रकावरही सहआरोपी म्हणून कारवाई केली जाऊ शकते. तसेच, एखाद्या व्यक्तीचे नाव किंवा छायाचित्र तिच्या संमतीनेच जाहिरातीवर प्रसिद्ध केल्याचे गृहीत धरले जाणार आहे. संबंधित व्यक्तीने या बाबत आक्षेप घेतल्यास क्षेत्रीय कार्यालयात लेखी अस्वीकृती आणि पोलिसांकडे तक्रार दाखल करणे आवश्यक राहणार आहे,’ असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.




