ओलसर मूर्ती, वेल्डिंग अपुरे राहिल्याने भुलेश्वरची दुर्घटना!


गणेशमूर्ती पूर्णपणे सुकलेली नसताना तसेच वेल्डिंगचे काम शिल्लक असताना अखिल भुलेश्वर सार्वजनिक मंडळाने ही मूर्ती मंडपात आणण्याची घाई केल्यामुळे दुर्घटना घडल्याची माहिती पुढे आली आहे.आगमनावेळी भुलेश्वरच्या राजाची मूर्ती शनिवारी रात्री कोसळल्याने संकेत नेवशे, ब्रिजेश जोशी या दोन तरुणांना आपले प्राण गमवावे लागले होते. या घटनेत जखमी झालेल्या सहा जणांवर जी. टी.,जे. जे. या रुग्णालयांत प्राथमिक उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

थायलंडमधील एका प्रसिद्ध मंदिरात असलेल्या गणपतीच्या मूर्ती प्रमाणेच ही मूर्ती घडवण्यात आली होती. भायखळा येथे कारखाना असलेल्या अनिकेत देसाई या तरुण मूर्तिकाराने ही मूर्ती घडवली होती. मूर्तीची उंची साधारण २८ फूट, तर वजन दोन टनाच्या आसपास होते.

मूर्ती पूर्णपणे सुकली नसल्यामुळे तसेच ती थोडी ओलसर असल्यामुळे दहा दिवसांनी मूर्ती घेऊन जा, असे मूर्तिकाराने भुलेश्वर येथील मंडळाच्या कार्यकर्त्यांना सांगितले होते. परंतु इंदोरवरून सामान घेऊन येणारा डेकोरेटर २९ तारखेला मुंबईत दाखल होणार असल्याने भुलेश्वरच्या मंडळातील कार्यकर्त्यांनी आगमनाची घाई केली होती.आगमनाच्या वेळी मूर्तिशाळेतून मूर्ती बाहेर पडताना गणपतीच्या गळ्यातील हार निसटला होता. त्यानंतर काही वेळाने पाठीमागची वेल्डिंगदेखील सुटली होती. त्यामुळे पुन्हा गणपती मंडपात नेऊन वेल्डिंग पूर्ववत करण्यात आले होते. भायखळा येथून आगमनासाठी गणपती मार्गस्थ होऊन भुलेश्वर मध्ये दाखल झाल्यावर पुन्हा एकदा गणपतीच्या गळ्यातील हार निसटून खाली आला होता.त्याच दरम्यान पुन्हा वेल्डिंग निसटल्याने गणपतीची मूर्ती कोसळल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यावेळी संकेत नेवसे आणि ब्रिजेश जोशी यांनी गणपतीला सावरण्याचा प्रयत्न केला होता. परंतु दोन टनाची मूर्ती या दोघांसह इतर कार्यकर्त्यांच्या अंगावर पडल्यामुळे अनर्थ घडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button