पाणीसाठा मुबलक, तरीही राजापूरकरांची पाण्यासाठी वणवण!


कोदवली धरण आणि शीळ जॅकवेलमध्ये पुरेसे पाणी; मात्र विस्कळीत वितरणामुळे नागरिक त्रस्त – बैठका होतात, ठोस उपाययोजना कधी?
राजापूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली धरण आणि शीळ जॅकवेल या दोन्ही प्रमुख जलस्रोतांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असतानाही राजापूर शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहरातील अनेक भागांत नियमित आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पाणीसाठा मुबलक असताना नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने नगरपरिषद प्रशासनाच्या पाणीपुरवठा नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी काही प्रमाणात मानसिक तयारी केली असली, तरी सध्याची परिस्थिती वेगळी आहे. कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेले कोदवली धरण पाण्याने भरलेले आहे. त्याचबरोबर अर्जुना नदीपात्रातून नगरपरिषदेच्या माध्यमातून करारानुसार शीळ जॅकवेलद्वारे शहरासाठी पाणी आणले जात आहे. यासाठी हजारो रुपयांचा वीजखर्चही केला जात आहे. असे असताना प्रत्यक्षात नागरिकांच्या नळाला पुरेशा दाबाने पाणी मिळत नसल्याने पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटी समोर येत आहेत.
डीपीआर तयार; प्रत्यक्ष कामाला मुहूर्त कधी?
राजापूर नगरपरिषदेने शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेच्या सुधारणेसाठी डीपीआर तयार केला आहे. मात्र, पाणीस्रोतापासून शहरापर्यंत आवश्यक पाइपलाइन टाकणे आणि त्यानंतर वितरण व्यवस्था सक्षम करणे गरजेचे आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर खोदकाम करून नवीन पाइपलाइन टाकावी लागणार असल्याने या कामाची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे.
जुन्या जलवाहिन्यांमधून हजारो लिटर पाण्याची गळती
शहरातील नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा वाहिन्या अनेक ठिकाणी जुन्या आणि जीर्ण झाल्या आहेत. या जलवाहिन्यांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असून, हजारो लिटर पाणी वाया जात आहे. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन आणि वितरण होत नसल्याने काही भागांत पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जुन्या जलवाहिन्यांची दुरुस्ती आणि आवश्यक ठिकाणी नवीन पाइपलाइन टाकण्याची मागणी होत आहे.
सार्वजनिक नळ बंद, स्वच्छतेचाही बोजवारा
पाणीपुरवठ्याच्या समस्येबरोबरच शहरातील सार्वजनिक नळही अनेक ठिकाणी बंद अवस्थेत आहेत. सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अपुरी असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर आठ-आठ दिवस सफाई कर्मचारी फिरकत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. त्यामुळे कचरा व्यवस्थापन आणि शहराच्या स्वच्छतेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
बैठका होतात; ठोस उपाययोजना कधी?
शहरातील पाणीप्रश्नावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका घेतल्या जात आहेत. मात्र, या बैठकांमधून प्रत्यक्षात काय निष्पन्न होत आहे, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. बैठका, चर्चा आणि नियोजन यापलीकडे जाऊन नागरिकांना नियमित व पुरेशा दाबाने पाणी मिळण्यासाठी ठोस उपाययोजना कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक नळ, स्वच्छता आणि अन्य मूलभूत नागरी सुविधांबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. एकीकडे पाण्याचे स्रोत उपलब्ध असताना दुसरीकडे नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे, ही बाब प्रशासनाच्या नियोजनातील त्रुटी अधोरेखित करणारी आहे. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने केवळ बैठका घेण्याऐवजी प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून पाणीगळती रोखणे, वितरण व्यवस्था सुधारणे आणि प्रलंबित कामे मार्गी लावणे आवश्यक आहे. अन्यथा, पाणीसाठा असूनही पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ राजापूरकरांवर कायम राहण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button