रत्नागिरी जिल्हा ‘शून्य कुपोषित’ करण्याचा संकल्प; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात ‘पोषण माह व मानसिक आरोग्य सप्ताह कार्यशाळा’


रत्नागिरी, दि. ८ ): “रत्नागिरी जिल्हा भविष्यात पूर्णपणे कुपोषणमुक्त व्हावा आणि जिल्ह्यात एकही कुपोषित बालक आढळू नये, हा आमचा ठाम मानस आहे. यासाठी प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने दर्जेदार पोषण आहारासह प्रत्येकाला सोबत घेऊन जबाबदारीने काम करावे,” असे स्पष्ट प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.
जिल्हा परिषद महिला व बालविकास विभाग आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आयोजित ‘पोषण माह व मानसिक आरोग्य सप्ताह कार्यशाळे’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. संघमित्रा फुले, माजी आमदार संजय कदम, पंचायत समिती सभापती प्रवीण पांचाळ, महिला व बालविकास सभापती मयुरी शिर्के, जिल्हा कार्यक्रम अधिकारी मल्लिनाथ कांबळे आदी उपस्थित होते.
संकटकाळात आरोग्य कर्मचारी देवाच्या रूपात धावले
कोरोना काळातील आठवणींना उजाळा देत पालकमंत्री म्हणाले, “त्या भयंकर महामारीत जेव्हा देवही भेटत नव्हता, तेव्हा डॉक्टर्स, नर्स, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा भगिनी देवाच्या रूपात धावून आल्या. त्यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता लोकांची सेवा केली. मानधनाचा विचार न करता घरोघरी जाऊन सर्वेक्षण व मार्गदर्शन करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे योगदान अतुलनीय आहे.”
‘नासा’ व ‘इस्रो’ भेट उपक्रमाचा राज्याला आदर्श
जिल्हा परिषदेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक करताना डॉ. सामंत म्हणाले, “रत्नागिरी जिल्हा परिषदेने सुरू केलेला शालेय विद्यार्थ्यांचा ‘इस्रो’ आणि ‘नासा’ भेट उपक्रम आज संपूर्ण महाराष्ट्रात राबवला जात आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तसेच माळरानावर पहिला सोलर प्रकल्प उभारण्याचा मानही रत्नागिरी जि.प.ने मिळवला आहे.” दरम्यान, आगामी काळातील पाणीटंचाईच्या निवारणासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहून काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन व वैविध्यपूर्ण सादरीकरण
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा कार्यक्रम अधिकारी मलिनाथ कांबळे यांनी कार्यशाळेमागील भूमिका मांडली. त्यानंतर विविध विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने झाली:

  • किशोरावस्थेतील आरोग्य: शासकीय नर्सिंग स्कूलच्या प्राचार्य श्रुती आंबेकर यांनी किशोरवयीन मुला-मुलींमधील भावनिक चढउतार, मासिक पाळी, स्क्रीन टाईम व सोशल मीडिया सुरक्षिततेवर मार्गदर्शन केले.
  • मातांचे मानसिक स्वास्थ्य: प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हरिणाक्षी गोसावी यांनी प्रसूतीपश्चात नैराश्य (Postpartum Depression) व त्यावरील उपचारांविषयी माहिती दिली.
  • संतुलित पोषण: जिल्हा रुग्णालयाच्या आहारतज्ज्ञ कविता जाधव आणि डॉ. नितीन सणगर यांनी पोषक आहार व आरोग्यदायी सवयींवर प्रकाश टाकला.
    ‘पोषण परी’ विशेष आकर्षण
    विविध भाज्या, फळे आणि तृणधान्यांची वेशभूषा परिधान करून आलेल्या प्रांजल शिंदे व आर्या शिंदे या दोन चिमुकल्या ‘पोषण परी’ सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.
    याप्रसंगी पोषण आहार पाककृती प्रदर्शन, सुंदर परसबाग फुलवणाऱ्या सुधा किंजळे (वाटद रायवाडी) यांचा सत्कार, स्त्री-भ्रूणहत्या विरोधी प्रबोधनपर पथनाट्य, प्रादेशिक मनोरुग्णालयाचे ‘चेहऱ्यामागचे मन’ हे नाटक आणि चांदेराई बीटच्या सेविकांची ‘पोषण जागर मंगळागौर’ अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.
    कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कक्षाधिकारी श्री. नागरगोजे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button