कोकणातील जनता शांत आहे पण ती हतबल नाही- खासदार श्री. सुनिल तटकरे


दापोलीः- अधिकाऱ्यांनी प्रशासकीय कामकाज करताना जनतेप्रती आपल्या संवेदना जागृत ठेवा, कोकणातील जनता ही शांत आहे, मात्र त्याचा अर्थ ती हतबल नाही. हे लक्षात घेऊन प्रत्येकाने काम करावे जनप्रक्षोभ होईल, असे काम होऊ देऊ नये असा सल्ला रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दापोली येथे आयोजित आढावा बैठकी दरम्यान सर्व अधिकाऱ्यांना दिला.
दापोली पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, महिला जिल्हाध्यक्ष साधना बोत्रे, प्रदेश सरचिटणीस संदीप राजपुरे, शिवसेनेचे सभापती उन्मेश राजे, जिप. सदस्य किशोर देसाई, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे, पंचायत समिती सदस्य भाऊ इदाते, प्रांताधिकारी डॉ. विजयकुमार सुर्यवंशी, तहसिलदार अर्चना बोंबे, गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी खातेनिहाय विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये विविध प्रश्नांना ना. तटकरे यांनी जागेवरच तोडगा काढला. यावेळी तटकरे यांनी पुढील 25 वर्षे पाणी योजनेसाठी भारत सरकार निधी देणार नाही. त्यामुळे पाणी योजनेचे काम करताना सर्वांनी जबाबदारी घेऊन काम करावे असे सांगितले. अधिकाऱ्यांना समजावून सांगतानाच जनतेच्याही प्रश्नांची उकल या बैठकीमध्ये करण्यात आली. यावेळी दापोली-पालगड रस्त्यामुळे पालगड नळपाणी योजनेची लाईन रस्त्याखाली जाउन पाणी टंचाई झाली असून त्याबाबत मार्ग काढण्यात आला तसेच अडखळ येथे डंपर उलटल्याने झालेल्या दुर्घटनेत चालकाचा मृत्यू ओढावला असून त्याबाबत फेर चौकशीचे आदेश दिले. बीएसएनएल बाबत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. त्याचप्रमाणे एसटी महामंडळाकडे वारंवार सूचना करूनही पाजपंढरी-मुंबई व भडवळे-नालासोपारा बस सुरू होत नसल्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. या बैठकीला विविध खात्याचे प्रमुख व विविध गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो डिपी 05-04 आढावा बैठकीत भूमिका मांडताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button