
ताम्हिणी घाटात भीषण अपघात; १२०० फूट खोल दरीत फॉर्च्युनर कोसळली, उद्योजक श्रीनिवास बेंडखळे यांचा मृत्यू!
ताम्हिणी घाटात पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. फॉर्च्युनर कार तब्बल १२०० फूट खोल दरीत कोसळून झालेल्या या अपघातात रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथील उद्योजक श्रीनिवास बेंडखळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे गोरेगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटेपासून श्रीनिवास बेंडखळे हे आपल्या कारसह बेपत्ता होते. त्यांचा शोध सुरू असताना पोलिसांनी मोबाईल लोकेशन तपासले. त्यावेळी त्यांचे शेवटचे लोकेशन ताम्हिणी घाट परिसरात असल्याचे समोर आले. त्यानंतर माणगाव पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. या मोहिमेसाठी सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या शोध व बचाव पथकाची मदत घेण्यात आली.
संस्थेचे तज्ज्ञ पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने खोल दरीत शोध घेण्यात आला. यावेळी सुमारे १२०० फूट खोल दरीत बेंडखळे यांची फॉर्च्युनर कार अपघातग्रस्त अवस्थेत आढळून आली.
पुण्यातील पौड पोलीस ठाण्याचे अधिकारी महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बचावकार्य हाती घेण्यात आले. दरीची प्रचंड खोली आणि दुर्गम भूभागामुळे बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक बनले होते. आधुनिक उपकरणांच्या मदतीने बचाव पथकाने दरीत उतरण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, अंधारामुळे मोहिमेत अडथळे निर्माण होत होते. मात्र, अपघातग्रस्त व्यक्ती जिवंत असण्याची शक्यता लक्षात घेऊन रात्रीच्या वेळीही बचावकार्य सुरू ठेवण्यात आले.
मात्र, बचाव पथकाला श्रीनिवास बेंडखळे यांचा मृतदेह आढळून आला. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. बेंडखळे हे उद्योग क्षेत्रासोबतच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही सक्रिय होते. त्यांच्या निधनाने गोरेगाव परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, हा भीषण अपघात नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.




