
मार्लेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात अचानक दगड कोसळले; भाविकांमध्ये खळबळ
आयआयटी मुंबईचे तज्ज्ञ पाहणी करत असतानाच घटना; खबरदारी म्हणून काही काळ दर्शन होते बंद
संगमेश्वर : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध धार्मिकस्थळ मार्लेश्वर मंदिराच्या गुहेतील गाभाऱ्यात शुक्रवारी दुपारी अचानक छोटे दगड कोसळल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, आयआयटी मुंबईचे तज्ज्ञ मंदिराची पाहणी करत असतानाच हा प्रकार घडला. सुदैवाने त्यावेळी भाविकांची गर्दी नसल्याने कोणालाही दुखापत झाली नाही.
शुक्रवारी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ भाविकांचे दर्शन थांबवण्यात आले. घटनेनंतर आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांनी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन पाहणी केली. त्यांच्या पाहणीतून नेमके काय निष्कर्ष समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, गेल्याच आठवड्यात मार्लेश्वर धबधब्याजवळ डोंगरावरून दगड कोसळून सांगली येथील एका चिमुकलीचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली होती. परिसरात सुरू असलेल्या पुलाच्या कामादरम्यान करण्यात आलेल्या सुरुंग स्फोटांमुळे डोंगरावरील दगड ढिले होऊन अशा घटना घडत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. याप्रकरणी चौकशी करून योग्य ती खबरदारी घेण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली होती.
आता थेट मंदिराच्या गाभाऱ्यातच दगड कोसळल्याने मार्लेश्वर परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांच्या पाहणी अहवालातून काय निष्पन्न होते आणि प्रशासन यावर काय उपाययोजना करते, याकडे भाविकांसह ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.




