
पुणे-सातारा महामार्गावर चिपळूणच्या कदम-पवार कुटुंबाच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर
वाई तालुक्यातील सुरूर गावच्या हद्दीत कार डिव्हायडरला धडकून दोन ते तीन वेळा पलटी; मुंबईहून चिपळूणला परतताना काळाचा घाला
चिपळूण : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील सुरूर गावच्या हद्दीत आईसाहेब क्षेत्राजवळ चिपळूण येथील कदम-पवार कुटुंबीयांच्या कारचा भीषण अपघात झाला. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार महामार्गावरील डिव्हायडरला जोरदार धडकून दोन ते तीन वेळा पलटी झाली. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत आणि जखमी हे चिपळूण येथील एकाच कुटुंबातील असल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण येथील कदम आणि पवार कुटुंबीय मुंबईहून चिपळूणकडे अल्टो कारने (MH 14 BK 7933) प्रवास करत होते. वैभव वामन कदम (वय ४५, रा. चिपळूण) हे कार चालवत होते. पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर वाई तालुक्यातील सुरूर गावच्या हद्दीत आईसाहेब क्षेत्राजवळ कार आली असता चालकाला अचानक झोपेची डुलकी लागली. त्यामुळे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट महामार्गावरील डिव्हायडरला जोरदार धडकली. धडकेची तीव्रता एवढी होती की कार दोन ते तीन वेळा पलटी झाली.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून तातडीने उपचारासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
या भीषण अपघातात विजय धोंडू पवार (वय ७०) आणि वैष्णवी वैभव कदम (वय ४३) यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर वैभव वामन कदम (वय ४५), वैशाली विजय पवार (वय ६२) आणि वेदांत वैभव कदम (वय १३) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक पृथ्वीराज यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
मुंबईहून चिपळूणकडे परतणाऱ्या एकाच कुटुंबावर काळाने घाला घातल्याने कदम-पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेने चिपळूण परिसरात शोककळा पसरली आहे.




