थंड वाऱ्यांनी महाराष्ट्र गोठवला; पारा थेट 8 अंशांवर, पाहा तुमच्या भागाचा अंदाज!

Maharashtra Weather Tomorrow : उत्तरेकडून विशेषतः मध्यप्रदेशातून महाराष्ट्राच्या दिशेने वाहणाऱ्या शीतलहरींमुळे संपूर्ण राज्य सध्या चांगलेच गारठले आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने घट होत असून, शुक्रवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमानाचा पारा लक्षणीयरीत्या खाली घसरला. यामध्ये जळगावने राज्यातील सर्वात थंड शहर म्हणून नोंद केली असून, तिथे नीचांकी 8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. मात्र, पुढील 24 तासांनंतर थंडीचा हा जोर काहीसा कमी होऊन किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात हुडहुडी

थंड वाऱ्यांचा सर्वाधिक प्रभाव उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात दिसून येत आहे. जळगावनंतर नाशिक आणि यवतमाळमध्ये पारा 10 अंश सेल्सिअसवर स्थिरावल्याने नागरिकांना हुडहुडी भरली आहे. मालेगाव (10.4° से.), पुणे (11.3° से.), छत्रपती संभाजीनगर आणि महाबळेश्वर (प्रत्येकी 12.4° से.) या शहरांमध्येही गुलाबी थंडीचा जोर वाढला आहे. याशिवाय अकोला (12.9° से.), धाराशिव (13° से.), सातारा (13.1° से.), अमरावती (13.2° से.), सोलापूर (13.4° से.) आणि अहिल्यानगरमध्ये (13.7° से.) तापमानात मोठी घट झाली आहे.

विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील इतर भागांतही गारठा जाणवत असून वाशिम (14.2° से.), सांगली (14.3° से.), बुलढाणा आणि नागपूर (प्रत्येकी 14.8° से.), वर्धा (15° से.), गोंदिया आणि कोल्हापूर (प्रत्येकी 15.8° से.), परभणी (16.1° से.) तसेच चंद्रपूरमध्ये (17° से.) किमान तापमानाची नोंद झाली आहे. कोकण किनारपट्टीवरही हवेत गारवा निर्माण झाला असून डहाणूमध्ये 16.6 अंश आणि रत्नागिरीत 19.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

मुंबईकरांनाही गुलाबी थंडीचा अनुभव

नेहमी दमट हवामान अनुभवणाऱ्या मुंबईतही शुक्रवारी किमान तापमान 21 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. पुढील 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सकाळच्या सत्रात धुरके पाहायला मिळेल, तर दुपारनंतर आकाश निरभ्र राहील. यावेळी किमान तापमान 18 अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता असून कमाल तापमान 32 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. 48 तासांनंतर मुंबईचे किमान तापमान पुन्हा 20 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल.

पुढील तीन दिवसांचा हवामान अंदाज

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 22 नोव्हेंबर रोजी मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे, तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे व निरभ्र राहील. 23 आणि 24 नोव्हेंबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या तिन्ही विभागांत आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. पुढील 4 ते 5 दिवस कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही. मात्र, पुढील 24 तासांनंतर राज्यातील किमान तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्यास सुरुवात होईल, ज्यामुळे कडाक्याच्या थंडीपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button