‘रामायण’ चित्रपटाचं प्रदर्शन तात्काळ थांबवा; विश्व हिंदू परिषद आक्रमक! रावणाच्या उदात्तीकरणावरून सेन्सॉर प्रमाणपत्र रद्द करण्याचीही मागणी!

‘Ramayana: Rise of a Legend’ : बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर याची मुख्य भूमिका असलेला बहुचर्चित चित्रपट ‘रामायण : राइज ऑफ अ लेजेंड’ प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटात लंकापती रावणाचं उदात्तीकरण करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत विश्व हिंदू परिषदेनं चित्रपटाच्या प्रदर्शनावर तात्काळ बंदी घालण्याची आणि त्याचं सेन्सॉर प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी केली आहे. ‘हिंदूस्तान टाइम्स’ ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

विश्व हिंदू परिषदेचे सरचिटणीस बजरंग लाल बागरा आणि आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांनी चित्रपटातील कथानकावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. या चित्रपटातून ऐतिहासिक आणि पौराणिक तथ्यांची मोडतोड करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. “हिंदू समाजाच्या भावनांशी खेळण्याचा हा प्रकार समाज कधीही खपवून घेणार नाही,” असा थेट इशारा बजरंग लाल बागरा यांनी वृत्तसंस्था ‘पीटीआय’शी बोलताना दिला.

रावणाचं उदात्तीकरण आणि कथानकातील बदलांवर आक्षेप

आलोक कुमार यांनीही चित्रपटातील रावणाच्या व्यक्तिरेखेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “या चित्रपटात रावणाला शोषित आणि वंचित समाजाचा तारणहार म्हणून दाखवण्यात आलं आहे. तो या घटकांच्या कल्याणासाठी काम करणारा नेता असल्याचं चित्रण केलं गेलं आहे. हा थेट रावणाचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न आहे,” असा आरोप कुमार यांनी केला.

रामायणातील महत्त्वाचे प्रसंग वगळल्याचा दावा

नितेश तिवारी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटातून रामायणातील अनेक महत्त्वाचे आणि भावनिक प्रसंग जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचं विहिंपने म्हटलं आहे. अहिल्या उद्धार, निषादराज गुह यांची मैत्री आणि केवट यांची निस्सीम भक्ती यांसारखे प्रसंग चित्रपटात दिसत नसल्याची खंत बागरा यांनी व्यक्त केली. प्रभू श्रीरामांचं सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्व समजून घेण्यासाठी हे प्रसंग अत्यंत महत्त्वाचे असल्याचं त्यांनी नमूद केलं.

“ऋषी-मुनींच्या तपश्चर्येत, यज्ञांमध्ये आणि गुरुकुल व्यवस्थेत अडथळे आणणाऱ्या समाजकंटक राक्षसांचा नाश करण्याचं प्रभू श्रीरामांचं महान कार्य या चित्रपटात चुकीच्या पद्धतीने मांडलं आहे. रामाचा हा संघर्ष म्हणजे केवळ पत्नीच्या अपहरणाचा सूड घेण्यासाठी केलेला वैयक्तिक लढा असल्याचं चित्रपटात दाखवलं गेलं आहे,” अशी टीका बागरा यांनी केली.

आलोक कुमार यांनीही या मुद्द्याला दुजोरा देत सांगितलं की, “प्रभू श्रीरामांनी माता अहिल्येच्या आश्रमात जाऊन तिला तिचा सन्मान परत मिळवून दिला. श्रीराम आणि भरत यांनी निषादराज यांना आपला मित्र मानून बरोबरीची वागणूक दिली. यातून त्यांनी अस्पृश्यता किंवा उच्च-नीच असा कोणताही भेदभाव नसल्याचा आणि केवळ प्रेमाचं नातं महत्त्वाचं असल्याचा संदेश दिला. केवट यांच्याशी श्रीरामांचं वागणंही सामाजिक सलोखा निर्माण करणारं होतं. मात्र, चित्रपटात या ऐतिहासिक घटनांचा विपर्यास करण्यात आला आहे.”

नैतिक मूल्यांवरच हल्ला असल्याची टीका

रावण हा विद्वान, शिवभक्त आणि शक्तिशाली असला तरी, त्याने प्रजेवर केलेल्या अत्याचारांमुळे तो ‘अनैतिक’च राहिला आणि रामायणाच्या प्रत्येक आवृत्तीत हे स्पष्टपणे मांडलं गेलं आहे, असं बागरा यांनी स्पष्ट केलं. मात्र, या चित्रपटातून रावणाला शोषितांचा कैवारी दाखवून एक राजकीय कथानक रचण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही मांडणी हिंदूंच्या भावना दुखावणारी असून समाजाच्या नैतिक पायावर केलेला हा हल्ला असल्याचं ते म्हणाले.

यापूर्वी नितीश भारद्वाज यांनीही केली होती टीका

विहिंपच्या आधी प्रसिद्ध ‘महाभारत’ मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते नितीश भारद्वाज यांनीही या चित्रपटावर टीका केली होती. ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी प्रभू श्रीरामांच्या सादरीकरणावर नाराजी व्यक्त केली होती. “या चित्रपटात प्रभू श्रीरामांना एका अत्यंत सामान्य आणि भावशून्य चेहऱ्याच्या माणसासारखं दाखवलं आहे. हे आमचे राम नाहीत. प्रभू श्रीराम हे ‘मर्यादेचं’ प्रतीक आहेत,” अशा शब्दांत त्यांनी आपला आक्षेप नोंदवला होता.

दरम्यान, नितेश तिवारी दिग्दर्शित या भव्य चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या, साई पल्लवी सीतेच्या, यश रावणाच्या, तर रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत आहेत. दोन भागांत विभागलेल्या या चित्रपटाचा पहिला भाग ५ नोव्हेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button