प्रशासनाचे आदेश हवेतच विरले? धामणदेवीतील केमिकलयुक्त कंटेनर प्रकरणात कारवाईला ब्रेक!

उपविभागीय अधिकाऱ्यांचे स्पष्ट निर्देश; तरीही संबंधित विभागांची निष्क्रियता, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत धामणदेवी येथील विरंगुळा हॉटेल परिसरात कथितरीत्या शासकीय परवानगीविना केमिकलयुक्त रिकामे व भरलेले कंटेनर साठविण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणात प्रशासनाच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना तातडीने चौकशी व आवश्यक कारवाईचे आदेश दिल्यानंतरही प्रत्यक्षात कोणतीही ठोस हालचाल न झाल्याचा आरोप होत असून, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
धामणदेवी येथील गट क्रमांक १३८/३/क/१०/ब/११ब/१२/१ या जागेत केमिकलयुक्त कंटेनर साठविले जात असल्याची तक्रार भाजपचे खेड दक्षिण तालुकाध्यक्ष विनोद शांताराम चाळके यांनी २१ जुलै २०२६ रोजी उपविभागीय अधिकारी, खेड यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती.
या तक्रारीची गंभीर दखल घेत उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांनी २४ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC), तहसीलदार, पोलीस निरीक्षक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) यांना चौकशी करून तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे लेखी निर्देश दिले. तसेच केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल सादर करण्यासही सांगितले होते.
तक्रारीनुसार, संबंधित ठिकाणी आवश्यक परवानग्यांशिवाय केमिकलयुक्त कंटेनर साठविले जात असून, त्यामुळे रासायनिक गळती, आग अथवा इतर दुर्घटना घडल्यास परिसरातील नागरिकांच्या जीवितासह पर्यावरणालाही गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मात्र आदेशानंतर अनेक दिवस उलटूनही कंटेनर हटविणे, पंचनामा करणे अथवा संबंधितांवर कारवाई झाल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे “प्रशासनाचे आदेश केवळ कागदापुरतेच मर्यादित राहिले आहेत का?” असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.
स्थानिक नागरिकांनी संबंधित सर्व विभागांनी संयुक्त पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, नियमांचे उल्लंघन आढळल्यास जबाबदारांवर कठोर कारवाई करावी आणि परिसरातील केमिकलयुक्त कंटेनर तातडीने हटवून नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button