
रत्नागिरी जिल्ह्याच्या पक्षी वैविध्यात नव्या प्रजातीची भर; पक्षी निरीक्षक श्रीकृष्ण मगदूम यांना आढळला दुर्मिळ पक्षी
राजापूर : जगामध्ये केवळ पश्चिम घाटात आढळून येणारा आणि महाराष्ट्राच्या दक्षिण भागापासून गोवा, कर्नाटक आणि केरळ प्रदेशात आढळून येणार्या राखी डोक्याचा बुलबुल पक्ष्याची रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच नोंद झाली आहे. प्रसिद्ध पक्षी निरिक्षक श्रीकृष्ण मगदूम यांना राजापूर तालुक्यामध्ये हा वैशिष्ट्यपूर्ण पक्षी आढळून आला आहे.
समुद्र सपाटीपासून थेट पश्चिम घाटाच्या पायथ्यापर्यंत विस्तारलेल्या रत्नागिरी जिल्ह्याला पश्चिम घाटाच्या निसर्गसंपदेचा वारसा लाभलेला आहे. जिल्ह्यामध्ये विविधांगी दुर्मिळ प्राणी आणि पक्ष्यांचा अधिवास सातत्यावे राहीलेला असल्याने नेहमीच अभ्यासकांचा जिल्ह्यावर लक्ष राहीलेले आहे. जिल्ह्यामध्ये विविध प्रजातीच्या 366 जातीच्या पक्ष्यांचा अधिवास असताना त्यामध्ये आता एका नव्याने पक्ष्याची भर पडली आहे. वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या राखी डोक्याचा बुलबुल पक्षी जगामध्ये केवळ पश्चिम घाट परिसरामध्ये आढळून येतो. या पक्ष्याची यापूर्वी महाराष्ट्राच्या दक्षिण भागापासून गोवा, कर्नाटक आणि केरळ प्रदेशात आढळून आला आहे. मात्र, त्याची आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आढळू दिसून आला आहे. पक्षी निरिक्षक श्री. मगदूम यांना राखी डोक्याच्या बुलबुल पक्षी राजापूर तालुक्यामध्ये आढळून आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच आढळून आलेल्या राखी डोक्याच्या बुबलबुल पक्ष्याच्या शरीराचा रंग हिरवट ऑलिव्ह असून डोके, मानेचा भाग आणि गळा राखाडी रंगाचा असतो. कपाळावर पिवळसर हिरवी छटा असते. डोळ्यांचा रंग फिकट निळसर पांढरा असून चोच करड्या-हिरव्या रंगाची असते. त्याच्या डोक्यावरील राखाडी रंगामुळे त्याला राखी डोक्याचा बुलबुल असे नाव मिळाले आहे. जंगलातील दाट झाडाझुटपांमध्ये वावरणार्या या पक्ष्याच्या आहारात विविध प्रकरची जंगली फळे, बेरी आणि लहान किटकांचा समावेश असतो. सहाहरीत जंगलामध्ये बांबूची बेटे, दाट झुडपे आणि फळझाडे त्याच्या अधिवासासाठी महत्वाची असतात. साधारणतः मार्च ते जुलै हा या पक्ष्याच्या प्रजननाचा काळ असून हा स्थलांतरीत पक्षी नसून पश्चिम घाटात आढळणारा स्थानिक निवासी पक्षी आहे. मर्यादीत भौगोलिक अधिवास आणि जंगलावरील अवलंबित्व यामुळे त्याच्या अधिवासाचे संवर्धन महत्वाचे मानले जाते. ‘स्टेट ऑफ इंडीयाज बर्डस् 2025’ च्या माहितीनुसार या पक्ष्याचा जागतिक स्तरावरील संवर्धन दर्जा लिस्ट कर्न्सन असून भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियमाच्या अनुसूची-2 मध्ये त्याचा समावेश आहे




