आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशनच्या वतीने पाचव्या सागर महोत्सवाचे जानेवारी महिन्यात आयोजन

रत्नागिरी : येथील आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशनच्या वतीने पाचवा सागर महोत्सव अर्थात ‘सीवर्स २७’ हा २१ ते २४ जानेवारी २०२७ या कालावधीत रत्नागिरी येथे आयोजित करण्यात येणार आहे. ‘वन ओशन, वन फ्युचर – बी सिरीयस’ ही महोत्सवाची व्यापक संकल्पना असून, यंदाचे पाचवे वर्ष महिला विशेष स्वरूपात साजरे केले जाणार आहे. सागर आणि मानवी जीवन यांचे अतूट नाते, सागरी जैवविविधता, हवामान बदल, पर्यावरणीय आव्हाने आणि शाश्वत विकास यांचा विविध अंगांनी वेध घेणे, हा महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे, अशी माहिती आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशनचे नंदकुमार पटवर्धन यांनी सांगितले.
हे उपक्रम चार दिवसांच्या महोत्सवापुरते मर्यादित न राहता वर्षभर चालणार आहेत. ‘सीवर्स’च्या माध्यमातून सागर आणि पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आसमंत सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. यावर्षी पुण्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ‘बी सिरीयस – द ओशन बिगीन्स वेअर यु लिव्ह’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. सागराचे महत्त्व केवळ समुद्रकिनाऱ्यापुरते मर्यादित नसून आपल्या दैनंदिन जीवनाशीही त्याचा संबंध आहे, हा विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा या उपक्रमाचा प्रयत्न होता.
रत्नागिरीतील जैवविविधता उद्यानामध्ये वर्षभरातील तीन ऋतूंमध्ये आढळणाऱ्या वनस्पती प्राणिजीवनाचा आणि जैवविविधतेचा (Flora, Fauna and biodiversity) अभ्यास व दस्तऐवजीकरण पूर्णत्वाकडे जात आहे. शहरी भागातील जैवविविधतेचे महत्त्व समजून घेणे, तिचे शास्त्रीय पद्धतीने निरीक्षण व नोंद करणे आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निसर्ग-अभ्यासाची संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा हेतू आहे.
गेल्या चार वर्षांतील सागर महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या सागरी पुळणी आणि खडकाळ किनाऱ्यांवरील अभ्यासफेऱ्या, निसर्गभ्रमंतीतून एक महत्त्वाचे छायाचित्रात्मक दस्तऐवजीकरण तयार झाले आहे. या किनाऱ्यांवर आढळणारे विविध छोटे सागरी जीव, कीटक आणि प्राणी यांची रंगीत छायाचित्रे व माहिती असलेले चित्रमय सागरी जैवविविधता फील्ड गाईड प्रकाशित करण्याचा आसमंतचा मानस आहे. किनाऱ्यावर फिरताना सहज नजरेत न येणाऱ्या, परंतु सागरी परिसंस्थेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या जीवसृष्टीची ओळख सर्वसामान्यांना व्हावी, हा यामागील उद्देश आहे.
याचबरोबर पथनाट्यांच्या माध्यमातून सागर, सागरी जैवविविधता आणि तिच्या संवर्धनाचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कला आणि अभिव्यक्तीच्या माध्यमातून पर्यावरणीय विषय सामान्य माणसापर्यंत सहजतेने पोहोचवणे, हा या उपक्रमाचा विशेष पैलू असेल.
या महोत्सवात यंदा महिलांचा विशेष सहभाग आणि नेतृत्व अधोरेखित केले जाणार आहे. सागर, हवामान बदल, जलसुरक्षा, शेती, मत्स्यव्यवसाय, मानवी आरोग्य तसेच पशू-पक्षी आणि निसर्ग संवर्धन अशा परस्परसंबंधित विषयांवर विविध क्षेत्रांतील महिला तज्ज्ञ, संशोधक आणि अभ्यासक आपले विचार व अनुभव मांडणार आहेत.
सागराकडे केवळ आर्थिक साधनसंपत्ती म्हणून न पाहता, तो पृथ्वीवरील जीवनाचा आधार आहे, या जाणीवेतून त्याच्याशी असलेले आपले नाते अधिक समजून घेणे आणि भावी पिढ्यांमध्ये संवर्धनाची दृष्टी निर्माण करणे, हा सीवर्सच्या प्रवासाचा केंद्रबिंदू आहे.
आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशनचा हा प्रयत्न विद्यार्थी, संशोधक, निसर्गप्रेमी, शैक्षणिक संस्था आणि समाजातील विविध घटकांना एका समान विचारधाग्याने जोडण्याचा असल्याचे ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button