
सावर्डेतील १३ वर्षीय मुलीचा मुंबईत शोध; संबंधित युवक पोलिसांच्या ताब्यात

चिपळूण सावर्डे येथून अपहरण झालेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा अखेर मुंबईत शोध लागला आहे. रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शुक्रवारी (दि. १३) मुंबईतून मुलीला सुरक्षित ताब्यात घेतले. यावेळी तिच्यासोबत असलेल्या संबंधित युवकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे शोधमोहीमेला यश आले आहे.
सावर्डे येथून ९ नोव्हेंबर रोजी ही अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या अपहरणप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रभारी पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच परिसरातील तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी क्यूआरटी पथके तैनात करण्यात आली होती.
दरम्यान, मुलीचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस (खेड), सुरेश कदम (लांजा), स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, चिपळूणचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे आणि सावर्डेचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक आबासो पाटील यांना शोधमोहीम तीव्र करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे विविध ठिकाणी शोध घेतला. अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मुंबईत मुलगी आणि तिच्यासोबत असलेल्या युवकाचा ठावठिकाणा लागला. त्यानंतर दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. मुलीला महिला पोलीस अंमलदारांच्या देखरेखीखाली सुरक्षित ठेवण्यात आले असून, संबंधित युवकाविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, प्रशांत बोरकर, सहायक पोलीस फौजदार पांडुरंग गोटे, पोलीस हवालदार विजय आंबेकर, योगेश नार्वेकर, वैभव मोरे, दीपराज पाटील, गणेश सावंत आणि चालक पोलीस हवालदार अतुल कांबळे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.




