
अखेर प्रतीक्षा संपली! कोकण रेल्वे मार्गावर १६ डब्यांची वंदे भारत दाखल
मुंबई-मडगाव एक्स्प्रेसची क्षमता दुप्पट होण्याचा मार्ग मोकळा; चिपळूण स्थानकात भगव्या-केशरी रंगाच्या नव्या रेकचे आगमन
खेड : कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसच्या प्रवासी क्षमतेत वाढ करण्याची मागणी अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सुरुवातीपासून अवघ्या आठ डब्यांसह धावणाऱ्या मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसला (२२२२९/२२२३०) आता १६ डब्यांचा रेक उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंगळवारी मुंबईहून रवाना झालेला भगव्या-केशरी रंगाचा १६ डब्यांचा वंदे भारत रेक सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास चिपळूण रेल्वे स्थानकात दाखल झाला. अवघ्या पाच मिनिटांच्या थांब्यानंतर सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी हा रेक मडगावच्या दिशेने रवाना झाला.
कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यापासून या गाडीला केवळ आठ डबे जोडण्यात आले होते. मात्र, या गाडीला प्रवाशांकडून सातत्याने मोठी पसंती मिळत असून बहुतांश वेळा गाडी हाऊसफुल्ल धावत होती. परिणामी प्रवाशांना आरक्षित तिकीट मिळविताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः सणासुदीच्या काळात आणि गर्दीच्या हंगामात या गाडीच्या मर्यादित आसनक्षमतेमुळे अनेक प्रवाशांना प्रतीक्षा यादीवर अवलंबून राहावे लागत होते.
या पार्श्वभूमीवर वंदे भारत एक्स्प्रेसची क्षमता आठ डब्यांवरून १६ किंवा २० डब्यांपर्यंत वाढविण्यात यावी, अशी मागणी विविध प्रवासी संघटना आणि कोकण रेल्वे प्रवासी संघटनांकडून सातत्याने करण्यात येत होती. प्रवाशांची वाढती संख्या आणि गाडीला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता डब्यांची संख्या वाढविणे आवश्यक असल्याचे प्रवासी संघटनांचे म्हणणे होते.
अखेर या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे १६ डब्यांच्या रेकच्या कोकण रेल्वे मार्गावरील आगमनावरून स्पष्ट होत आहे. नव्या रेकमुळे मुंबई-मडगाव मार्गावरील वंदे भारतची प्रवासी क्षमता वाढण्याची अपेक्षा असून कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मात्र, ही १६ डब्यांची सेवा कायमस्वरूपी सुरू राहणार की काही कालावधीसाठी प्रायोगिक अथवा तात्पुरत्या स्वरूपात डब्यांची वाढ करण्यात आली आहे, याबाबत रेल्वे प्रशासनाकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रवाशांचे लक्ष आता रेल्वे प्रशासनाच्या अंतिम निर्णयाकडे लागले आहे. तूर्तास १६ डब्यांचा रेक कोकण रेल्वे मार्गावर दाखल झाल्याने प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.




