बालदिनानिमित्त भारतीय सैन्यातील ‘अग्निवीर’ व अधिकारी पदांच्या संधींवर रत्नागिरीत मार्गदर्शन

रत्नागिरी: बालदिनाचे औचित्य साधून भारतीय सशस्त्र दलातील करिअरच्या संधींविषयी माहिती देण्यासाठी रत्नागिरी येथील शिरगाव मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन महाविद्यालयात एका विशेष जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. २ महाराष्ट्र नेव्हल युनिट, रत्नागिरीच्या एनसीसी कॅडेट्ससाठी हे सत्र आयोजित करण्यात आले होते. सेना भरती कार्यालय (एआरओ), कोल्हापूरचे संचालक कर्नल प्रशांत सिंग यांनी या सत्रात उपस्थित राहून कॅडेट्सशी संवाद साधला. त्यांनी ‘अग्निपथ योजना’ तसेच भारतीय सैन्यात अधिकारी पदावर (एनडीए, सीडीएस आणि डायरेक्ट एंट्रीद्वारे) भरती होण्याच्या विविध मार्गांची सविस्तर माहिती दिली.
या सत्रात कर्नल सिंग यांनी अग्निवीर व अधिकारी पदांच्या निवडीसाठी आवश्यक पात्रता, शारीरिक व वैद्यकीय निकष, निवड प्रक्रिया आणि परीक्षेच्या तयारीचे नियोजन यावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच, लष्करी जीवनातील शिस्त, नेतृत्वगुण आणि राष्ट्रसेवेचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
यानंतर झालेल्या प्रश्नोत्तर सत्रात कॅडेट्सनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शारीरिक तयारी, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, लेखी परीक्षेचे स्वरूप आणि लष्करातील पदोन्नतीच्या संधी यांबाबत कॅडेट्सनी विचारलेल्या सर्व शंकांचे कर्नल सिंग यांनी निरसन केले. यामुळे कॅडेट्सना सैन्यात दाखल होण्याची स्पष्ट दिशा आणि नवी प्रेरणा मिळाली.
सैन्य भरतीची माहिती जिल्ह्यातील इतर विद्यार्थी आणि नागरिकांपर्यंत पोहोचावी, यासाठी सत्राच्या शेवटी माहितीपत्रके व पोस्टर्सचे वाटप करण्यात आले. ही पोस्टर्स स्थानिक शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी लावली जाणार आहेत. या उपक्रमामुळे रत्नागिरीतील युवकांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली असून, त्यांना लष्करात करिअर करण्यासाठी अधिकृत मार्गदर्शन लाभले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button