
टाळसुरे येथे भरदिवसा घरफोडी; ३ लाख ९७ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास
अज्ञात चोरट्यांनी लोखंडी कपाटाचे लॉकरलाच असलेल्या चावीने लॉकर उघडून दागिन्यांवर मारला डल्ला
दापोली ) : तालुक्यातील टाळसुरे शेलारवाडी नं. 2 येथे भरदिवसा घरफोडीची घटना घडली असून, किरण किसन चोगले यांच्या घरातून सुमारे ३ लाख ९७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही घटना ३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९.१५ ते दुपारी १२.४५ या वेळेत घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण चोगले हे नोकरी निमित्त खेड येथे गेले होते. त्यांच्या आई घराच्या जवळ परिसराची साफसफाई करीत असताना घराच्या दरवाजातून अज्ञात व्यक्तीने आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी कपाटाचे लॉक लॉकरला असलेल्या चावीने उघडून त्यामधील सोन्याचे दागिने चोरून नेले.
चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये सुमारे १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, १ ग्रॅम वजनाची सोन्याची बाळी, २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कर्णफुले, ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके, ४ ग्रॅम वजनाची सोन्याची आंगठी, २५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, ४ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र आणि १ ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील रिंग अशा दागिन्यांचा समावेश आहे.
या सर्व दागिन्यांची एकूण किंमत ३ लाख ९७ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घरातील कपाटाची पाहणी केल्यानंतर सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर किरण किसन चोगले यांनी दापोली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारी नुसार दापोली पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 305(a) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक राजकुमार यादव करत आहेत.
टाळसुरे परिसरात भरदिवसा घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.




