जास्त घाम आल्यानं खरंच वजन कमी होतं की फक्त शरीरातील पाणी घटतं? जाणून घ्या शरीरात नेमकं काय घडतं!

Does Sweating Help in Weight Loss : नोव्हेंबर महिना सुरू झाला असून, हळूहळू थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. सकाळी आणि रात्री हवेत गारवा जाणवू लागला आहे. अशा वातावरणातही काही लोकांना थोडे चालले किंवा जिने चढले तरी प्रचंड घाम येतो; तर काही जण व्यायाम करताना अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या की, आपली चरबी वेगाने जळत असल्याचा समज करून घेतात.

अनेकांना तर वजन कमी करण्यासाठी जास्त घाम गाळणे आवश्यक वाटते. पण खरेच घाम जितका जास्त येईल, तितके वजन कमी होते का? की हा केवळ एक गैरसमज आहे? विशेष म्हणजे घाम येणे आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे वजन कमी करण्याचा प्रयत्न करीत असाल, तर त्यामागचे सत्य जाणून घेणे आवश्यक आहे.

घाम नेमका कधी आणि का येतो?

आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी घाम येण्याची नैसर्गिक प्रक्रिया कार्यरत असते. वातावरणातील तापमान वाढले किंवा हवेत आर्द्रता जास्त झाली की, शरीरातील घामाच्या ग्रंथी सक्रिय होतात आणि त्यातून घाम बाहेर पडतो. घामाचे बाष्पीभवन झाल्यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होते.

मात्र, केवळ उष्ण वातावरणामुळेच घाम येतो, असे नाही. मानसिक ताण, चिंता, भीती किंवा एखाद्या गोष्टीची काळजी वाटत असतानाही काही व्यक्तींना घाम येऊ शकतो. अशा वेळी हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढू शकतो. त्याशिवाय धावणे, चालणे, व्यायाम करणे किंवा इतर शारीरिक हालचाली करतानाही शरीराचे तापमान वाढते आणि घाम येऊ लागतो.

जास्त घाम आला म्हणजे वजन कमी होतं का?

हा अनेकांच्या मनातील सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर नाही, असे नाही. जास्त घाम येणे आणि शरीरातील चरबी कमी होणे यांचा थेट संबंध नाही. घामाद्वारे शरीरातून मुख्यतः पाणी आणि काही क्षार बाहेर पडतात. त्यामुळे व्यायामानंतर वजनकाट्यावर वजन काही प्रमाणात कमी दिसू शकते; मात्र त्याचा अर्थ शरीरातील अतिरिक्त चरबी कमी झाली, असा होत नाही.

उदाहरणार्थ- तुम्ही उन्हात बराच वेळ चाललात किंवा गरम वातावरणात व्यायाम केलात, तर भरपूर घाम येऊ शकतो. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण तात्पुरते कमी होते. मात्र, पाणी प्यायल्यानंतर हे वजन पुन्हा वाढू शकते. त्यामुळे केवळ घामाच्या प्रमाणावरून वजन कमी होत असल्याचा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे.

घामाद्वारे शरीरातील कोणते घटक बाहेर पडतात?

घामामध्ये प्रामुख्याने पाणी असते. त्याशिवाय सोडियम आणि क्लोराईड यांसारखे इलेक्ट्रोलाइट्सही घामाद्वारे बाहेर पडतात. तसेच पोटॅशियम, मॅग्नेशियम व कॅल्शियम यांसारखे घटकही कमी प्रमाणात बाहेर पडतात.

हे घटक शरीरातील पाण्याचे संतुलन, स्नायूंचे कार्य आणि इतर महत्त्वाच्या प्रक्रियांसाठी आवश्यक असतात. त्यामुळे भरपूर घाम आल्यास शरीरातील पाण्याची कमतरता होऊ शकते. अशा वेळी पुरेसे पाणी पिणे आणि संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे. विशेषतः व्यायाम किंवा शारीरिक मेहनतीनंतर शरीराला आवश्यक असलेले पाणी आणि क्षार भरून काढण्याकडे लक्ष द्यावे.

मग वजन कमी करण्यासाठी नेमकं काय करावं?

शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करायची असेल, तर केवळ घाम गाळून उपयोग होत नाही. तर, त्यासाठी नियमित शारीरिक हालचाली आणि संतुलित आहार या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

१. नियमित व्यायाम करा: चालणे, धावणे, सायकल चालवणे किंवा पोहणे यांसारख्या शारीरिक हालचालींमुळे उष्मांक कमी होण्यास मदत होते.

२. संतुलित आहार घ्या: आहारात भाज्या, फळे, डाळी, प्रथिने आणि तंतुमय पदार्थांचा समावेश करा. अति प्रमाणात साखर आणि तेलकट पदार्थ खाणे टाळा.

३. जेवणानंतर थोडे चाला: जेवणानंतर हलके चालल्यामुळे पचनक्रियेला मदत होते आणि दैनंदिन शारीरिक हालचालींचे प्रमाण वाढते.

४. पुरेशी झोप घ्या: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आहार आणि व्यायामाइतकीच पुरेशी झोपही महत्त्वाची आहे.

५. पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करू नका: घाम कमी येत असला तरी शरीराला पुरेशा प्रमाणात पाणी मिळणे आवश्यक आहे.

त्यामुळे वजन कमी करण्यासाठी मुद्दाम उन्हात बसून किंवा गरम वातावरणात व्यायाम करून घाम काढण्याचा प्रयत्न करू नका. विशेषतः थंडीच्या दिवसांतही व्यायाम करताना शरीराला योग्य तापमान राखता येईल अशा वातावरणात हालचाली करा. घाम कमी आला म्हणजे व्यायामाचा फायदा झाला नाही, असेही समजू नका. वजन कमी होण्याचा खरा संबंध नियमित व्यायाम, योग्य आहार आणि सातत्यपूर्ण जीवनशैलीशी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button