
‘रामायण’ मधील रावणाच्या सिंहासनावर १ कोटींचा खर्च! शूर्पणखेच्या रथाची किंमत ऐकून व्हाल थक्क; २४ कॅरेट सोन्याचा मुलामा देण्यासाठी लागले चार महिने!
The makers have spent a fortune on this film, which was made at a cost of Rs 4,000 crore : रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांचा ‘रामायण’ हा चित्रपट सिनेमागृहांत प्रदर्शित झाला असून प्रेक्षक आणि समीक्षकांकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी, ग्राफिक्स आणि ॲनिमेशन प्रेक्षकांना विशेष भावलं आहे. तब्बल ४,००० कोटी रुपये खर्चून बनवण्यात आलेल्या या चित्रपटासाठी निर्मात्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे.
‘रामायण’मधील भव्य सेट उभारण्यासाठी निर्मात्यांनी विशेष मेहनत घेतली आहे. यासाठी केवळ प्रचंड मेहनतच नाही, तर मोठ्या प्रमाणात पैसाही खर्च करण्यात आला आहे. चित्रपटात रावणासाठी दाखवण्यात आलेलं भव्य सिंहासन तब्बल एक कोटी रुपयांचं आहे. तर रकुल प्रीतने साकारलेल्या शूर्पणखेच्या रथासाठी याहूनही अधिक खर्च करण्यात आला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
‘रामायण’साठी उभारले १५० हून अधिक भव्य सेट
आर्ट डायरेक्टर रमेश यांनी नुकत्याच ‘प्रभात खबर’ला दिलेल्या मुलाखतीत ‘रामायण’ चित्रपटाच्या सेटबद्दल माहिती दिली. चित्रपटात रामायणाचं विश्व मोठ्या पडद्यावर भव्य स्वरूपात दाखवण्यासाठी विशेष मेहनत घेण्यात आली आहे. त्यांनी सांगितलं की, जटायूचा तब्बल २४ फूट उंचीचा मॉडेल तयार करण्यात आला होता. तर चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी १५० हून अधिक सेट उभारण्यात आले होते. एप्रिल २०२४ मध्ये या सेटच्या निर्मितीला सुरुवात झाली होती. हे सर्व सेट मुंबईतील फिल्म सिटीमध्ये तयार करण्यात आले होते.
रावणाच्या सिंहासनासाठी खर्च केले १ कोटी रुपये
‘रामायण’ चित्रपटातील रावणाचं सिंहासन तयार करण्यासाठीही निर्मात्यांनी कोट्यवधी रुपये खर्च केले असून याला चार महिने लागले. त्यावर जवळपास एक कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हे सिंहासन फायबरपासून तयार करण्यात आलं होतं. सिंहासन अधिक भव्य दिसावं यासाठी त्यावर २४ कॅरेट सोन्याचा मुलामाही चढवण्यात आला होता. विशेष म्हणजे, शूर्पणखेच्या खास रथासाठी तर रावणाच्या सिंहासनापेक्षाही अधिक खर्च करण्यात आला. हा रथ तयार करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागला असून त्यासाठी तब्बल दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
६ वर्षांच्या मेहनतीनंतर तयार झालं रावणाचं पुष्पक विमान
चित्रपटातील रावणाच्या पुष्पक विमानाबद्दलही खास माहिती समोर आली आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी गेल्या सहा वर्षांपासून या पुष्पक विमानाच्या निर्मितीवर काम करत होते. हे विमान तब्बल ५० फूट रुंद होतं. आकाराने एवढं मोठं असल्यामुळे ते स्टुडिओमध्ये मावणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्याचे चार वेगवेगळे भाग तयार करण्यात आले. हे चार भाग बनवण्यासाठी ४० ते ५० दिवसांचा कालावधी लागला. याशिवाय, जटायूचं २४ फूट आकाराचं मॉडेलही तयार करण्यात आलं होतं.
दरम्यान, रमेश यांनी सांगितलं की रावणाची सोन्याची लंका उभारण्यासाठीही बराच वेळ लागला होता. या भव्य सेटच्या निर्मितीसाठी ५०० ते ६०० कामगारांनी अहोरात्र मेहनत घेतली. लंकेतील गर्दीच्या दृश्यांचं चित्रीकरण करताना तब्बल १,००० डान्सर्स आणि ज्युनिअर आर्टिस्टना कामासाठी बोलावण्यात आलं होतं. रमेश यांच्या म्हणण्यानुसार, नितेश तिवारी शूटिंगच्या चार दिवस आधीच रीबोर्ड आणि कॉन्सेप्ट आर्टचं बारकाईने परीक्षण करायचे. तसेच, ते स्वतः सेटची पाहणीही करायचे.




