
नऊ महिन्यांनंतर गहाळ मोबाईलचा शोध; लांजा पोलिसांना यश
लांजा: लांजा बाजारपेठेत गहाळ झालेला पालू-नामयेवाडी येथील एका व्यक्तीचा मोबाईल तब्बल नऊ महिन्यांनंतर सापडला असून तो शोधून काढण्यात लांजा पोलिसांना यश आले आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे मध्यप्रदेश आणि त्यानंतर पुणे येथील लोकेशनचा माग काढत पोलिसांनी हा मोबाईल हस्तगत केला असून संबंधित व्यक्तीला मोबाईल सुपूर्द करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील पालू-नामयेवाडी येथील शांताराम आत्माराम खाके यांचा विवो कंपनीचा मोबाईल ३ फेब्रुवारी २०२६ रोजी लांजा बाजारपेठेत गहाळ झाला होता. याबाबत त्यांनी लांजा पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिसांनी मोबाईलचा शोध सुरू केला. तपासादरम्यान संबंधित मोबाईल प्रथम मध्यप्रदेश येथे सुरू झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र, त्यानंतर त्याचे लोकेशन मिळत नव्हते.
त्यानंतर ४ जुलै रोजी या मोबाईलमध्ये पुन्हा सिमकार्ड टाकून तो सुरू करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यावेळी मोबाईलचे लोकेशन पुणे येथील साने पोलीस चौकीच्या हद्दीत मिळाले. त्यानुसार लांजा पोलिसांनी पुणे पोलिसांशी संपर्क साधून मोबाईल वापरणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला आणि मोबाईल ताब्यात घेतला. तर तब्बल नऊ महिन्यांनंतर आपला गहाळ मोबाईल परत मिळाल्याने शांताराम खाके यांनी समाधान व्यक्त करत लांजा पोलिसांचे आभार मानले.
दरम्यान, लांजा पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या हस्ते शांताराम खाके यांना मोबाईल सुपूर्द करण्यात आला. ही कामगिरी पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास जाधव, महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रतिक्षा राणे आणि पोलीस कॉन्स्टेबल अजीज नदाफ यांनी पार पाडली.




