
तुमच्या वयानुसार शरीरात व्हिटॅमिन B12 किती असायला हवं? पाहा, सोप्या चार्टवरून तुम्हाला बी१२ची गरज किती?
Vitamin B12 Level Age Wise Normal Range Chart : आजकाल अनेकांना सतत थकवा जाणवणे, थोडेसे काम केल्यानंतरही अशक्तपणा येणे, डोकेदुखी आणि चक्कर येणे अशा अनेकविध समस्यांचा सामना करावा लागतो.
अनेकदा आपण या तक्रारींकडे कामाचा ताण, अपुरी झोप किंवा धावपळीची जीवनशैली म्हणून दुर्लक्ष करतो. मात्र, शरीरात एका महत्त्वाच्या जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण झाल्यामुळेही या समस्या उद्भवू शकतात. हे जीवनसत्त्व म्हणजे व्हिटॅमिन B12! शरीराच्या योग्य कार्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या या जीवनसत्त्वाची कमतरता आज अनेकांमध्ये आढळून येत आहे. काही अहवालांनुसार, भारतातील मोठ्या लोकसंख्येला व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या जीवनसत्त्वाच्या पातळीकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.
शरीरासाठी व्हिटॅमिन B12 इतकं महत्त्वाचं का?
व्हिटॅमिन B12 हे शरीरातील अनेक महत्त्वाच्या प्रक्रियांसाठी आवश्यक असलेले जीवनसत्त्व आहे. विशेषतः लाल रक्तपेशींची निर्मिती, मेंदू आणि मज्जासंस्थेचे योग्य कार्य तसेच डीएनएच्या निर्मितीमध्ये या जीवनसत्त्वाची महत्त्वाची भूमिका असते. शरीरातील मज्जातंतूंचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठीही व्हिटॅमिन B12 आवश्यक आहे.
मात्र, शरीरात या जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण झाल्यास त्याचा परिणाम हळूहळू आरोग्यावर दिसू लागतो. सतत थकवा जाणवणे, अशक्तपणा, रक्तक्षय, हृदयाचे ठोके अनियमित होणे आणि पचनाशी संबंधित तक्रारी उद्भवू शकतात. ???दीर्घकाळ कमतरता राहिल्यास मज्जासंस्थेवरही परिणाम (की- दीर्घकाळ या जीवनसत्त्वाची कमतरता टिकून राहिल्यास मज्जासंस्थेवरही विपरीत परिणाम)??? होण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता, वेळीच तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे.
व्हिटॅमिन B12 ची कमतरता नेमकी कशामुळे होते?
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, आहारातील पोषक घटकांची कमतरता आणि काही वैद्यकीय कारणांमुळे शरीरातील व्हिटॅमिन B12 ची पातळी कमी होऊ शकते. विशेषतः शाकाहारी आहार घेणाऱ्या व्यक्तींना या जीवनसत्त्वाचे पुरेसे प्रमाण मिळवताना अडचणी येऊ शकतात. कारण- व्हिटॅमिन B12 प्रामुख्याने दूध, दही, चीज, अंडी, मासे आणि मांस यांसारख्या पदार्थांमध्ये आढळते.
त्याशिवाय पोट आणि आतड्यांशी संबंधित काही आजार, शरीरात जीवनसत्त्वांचे शोषण व्यवस्थित न होणे, तसेच वाढते वय यांमुळेही कमतरता निर्माण होऊ शकते. वय वाढल्यानंतर शरीराची व्हिटॅमिन B12 शोषून घेण्याची क्षमता कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी या जीवनसत्त्वाच्या पातळीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
वयानुसार शरीरात व्हिटॅमिन B12 किती असावं?
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या माहितीनुसार, प्रौढ व्यक्तीच्या रक्तातील व्हिटॅमिन B12 चे प्रमाण ३०० pg/mL पेक्षा जास्त असल्यास ते सामान्य मानले जाते. २०० ते ३०० pg/mL दरम्यानचे प्रमाण सीमारेषेवरील मानले जाते, तर २०० pg/mL पेक्षा कमी प्रमाण असल्यास कमतरतेची शक्यता असते.
वयानुसार व्हिटॅमिन B12 चे प्रमाण समजून घेण्यासाठी पुढील तक्ता पाहा….
वयोगट
व्हिटॅमिन B12 चे प्रमाण
० ते १२ महिन्यांची बालके
२०० ते ८०० pg/mL
१ ते १७ वर्षे वयोगटातील मुले
३०० ते ९०० pg/mL
१८ वर्षे आणि त्यापुढील व्यक्ती
२०० ते ९०० pg/mL
हे प्रमाण संदर्भासाठी असून, प्रयोगशाळेनुसार सामान्य मर्यादांमध्ये फरक असू शकतो. त्यामुळे केवळ या तक्त्यावरून स्वतःच्या आरोग्याचा निष्कर्ष काढू नये. रक्ततपासणीचा अहवाल डॉक्टरांकडून समजून घेणे आवश्यक आहे.
व्हिटॅमिन B12 कमी झाल्यास शरीरात दिसतात ‘ही’ लक्षणं
१. पचनाच्या समस्या: शरीरात व्हिटॅमिन B12 ची कमतरता असल्यास काही व्यक्तींना जुलाब, मळमळ, उलट्या, बद्धकोष्ठता, पोट फुगणे व गॅस यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
२. त्वचेचा रंग फिकट पडणे: शरीरात या जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण झाल्यास रक्तक्षयाचा त होऊ शकतो. परिणामी त्वचा नेहमीपेक्षा फिकट किंवा पिवळसर दिसू शकते.
३. सतत थकवा आणि अशक्तपणा: पुरेशी झोप घेऊनही थकवा जाणवत असेल, थोडेसे काम केल्यानंतर अशक्तपणा येत असेल, तर त्यामागे व्हिटॅमिन B12 ची कमतरता हे एक कारण असू शकते.
४. डोकेदुखी आणि मज्जासंस्थेवर परिणाम: B12 ची कमतरता असल्यास काही व्यक्तींना डोकेदुखी, हातापायांना मुंग्या येणे किंवा बधिरपणा जाणवू शकतो. दीर्घकाळ कमतरता राहिल्यास मज्जातंतूंचे नुकसान होण्याचाही धोका असतो.
५. होमोसिस्टीनची पातळी वाढणे: शरीरात व्हिटॅमिन B12 कमी झाल्यास होमोसिस्टीन नावाच्या अमिनो आम्लाची पातळी वाढू शकते. होमोसिस्टीनचे प्रमाण वाढणे हे हृदय व रक्तवाहिन्यांच्या आरोग्याशी संबंधित जोखमीचे एक निदर्शक असू शकते.
त्यामुळे सतत थकवा, अशक्तपणा किंवा इतर त्रास जाणवत असल्यास स्वतःहून औषधे अथवा जीवनसत्त्वांच्या गोळ्या घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य वेळी रक्ततपासणी करून शरीरातील व्हिटॅमिन B12 चे प्रमाण जाणून घेणे आणि आवश्यक उपचार घेणे महत्त्वाचे आहे.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य जागरूकतेसाठी आहे. ही वैद्यकीय सल्ल्याची जागा घेऊ शकत नाही. कोणतीही लक्षणे जाणवल्यास किंवा उपचार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.)




