रत्नागिरी जिल्हा कचरामुक्त करण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक-नगराध्यक्षा कृपा घाग


दापोलीः- रत्नागिरी जिल्हा संपूर्णपणे कचरामुक्त करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, महिला बचत गट, शाळा आणि महाविद्यालयाचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन दापोली नगरपंचायतीच्यानगराध्यक्षा सौ. कृपा घाग यांनी केले. दापोली येथ घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आयोजित प्रादेशिक विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
विभागीय नागरी व पर्यावरण संशोधन केंद्र (आरसीयुईएस), अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था (एआयआयएलएसजी) मुंबई आणि भारत सरकारच्या गृह व आवास मंत्रालयाच्या सहकार्याने या विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छ भारत अभियान-नागरी 2.0 अंतर्गत आयोजित या कार्यक्रमाला आरसीयुईएसचे संचालक डॉ. अजित साळवी आणि संशोधन अधिकारी मेघा धुरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या मार्गदर्शनात नगराध्यक्षा सौ. कृपा घाग म्हणाल्या, स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शाळा, महाविद्यालये आणि महिला बचत गटांना सहभागी करून व्यापक जनजागृती व लोकसहभागातून रत्नागिरी जिल्हा कचरामुक्त करावा लागेल. प्रशिक्षण सत्रात कोकण भागातील भौगोलिक व स्थानिक परिस्थितीचा विचार करून कचरा व्यवस्थापनावर मार्गदर्शन करण्यात आले. यात प्रामुख्याने स्त्रोतस्थळी वर्गीकरण व प्रक्रिया, हंगामानुसार नियोजन-गणेशोत्सव, पावसाळा, यात्रा उत्सव आणि डोंगराळ भागातील कचरा डेपो यांसारख्या स्थानिक आव्हानांवर गटचर्चा करून कृती आराखडे तयार करण्यात आले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सहभागी प्रतिनिधींना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या प्रशिक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांची क्षमता वाढून प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या समन्वयातून रत्नागिरी जिल्हा स्वच्छ व पर्यावरणपूरक होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button