दापोली तालुक्यात मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षणाला मुदतवाढ


दापोलीः- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबत दापोली तहसिलदार कार्यालयाच्या वतीने सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
यापूर्वा 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानंतर मतदार यादीतील नाव, पत्ता, वय, जन्मतारीख आदी तपशिलांबाबत दावे व हरकती दाखल करण्यासाठी 26 ऑक्टोबर 2026 पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, भारत निवडणूक आयोगाच्या 29 ऑक्टोबर 2026 रोजीच्या पत्रानुसार या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार दावे व हरकती दाखल करण्याची मुदत आता 13 नोव्हेंबर 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच नोटीस कालावधी आणि दावे-हरकती निकाली काढण्याची मुदत 25 नोव्हेंबर 2026 पर्यंत राहणार असून, अंतिम मतदार यादी 30 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिध्द केली जाणार आहे.
दरम्यान, मतदारांनी प्रारूप मतदार यादीतील आपले नाव, पत्ता, वय आणि जन्मतारीख यांसह सर्व तपशील काळजीपूर्वक तपासावेत. काही दुरूस्ती आवश्यक असल्यास विहित नमुन्यात ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज सादर करावा. तसेच नवीन मतदारांनी नोंदणी करून घ्यावी आणि प्रारूप यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मतदारांना भारत निवडणूक आयोगाच्या सिटीझन सर्व्हिस पोर्टल तसेच ईसीआय मोबाईल ॲपव्दारे नोंदणी व मतदार यादीतील तपशील तपासता येणार आहेत. ऑफलाईन प्रक्रियेसाठी संंबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी तहसिलदार कार्यालय, दापोली येथील निवडणूक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार दापोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button