
दापोलीत मटका जुगारावर रत्नागिरी पोलिसांची कारवाई; २,३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त
दापोली (वार्ताहर ) : दापोली शहरातील बुरोंडी नाका परिसरात एका टपरीच्या बाजूला सुरु असलेल्या मटका जुगारावर रत्नागिरी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम आणि जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य असा एकूण २ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयित प्रसाद नथुराम घोडे (वय ५५, रा. काळकाई कोंड,दापोली) याच्याविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज ४ नोव्हेंबर २०२६ रोजी रत्नागिरी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला दापोली शहरातील बुरोंडी नाका परिसरात मटका जुगार खेळविला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास संबंधित ठिकाणी जाऊन कारवाई केली.
या कारवाईदरम्यान संशयित प्रसाद घोडे हा मटका जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जवळ बाळगून जुगार चालवित असल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून २ हजार ३६० रुपये रोख रक्कम, तसेच जुगाराच्या नोंदी असलेले साहित्य आणि इतर वस्तू असा एकूण २ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हेड कॉनस्टेबल रुपाली यादव करीत आहेत.




