राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत राहुल कळंबटे प्रथम


‘नटसम्राट’मधील नाना पाटेकर यांच्या व्यक्तिचित्राला प्रथम क्रमांकाची दाद


देवगड : युथ फोरम देवगड आयोजित भव्य राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा २०२६ मध्ये रत्नागिरीचे राहुल कळंबटे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेत राज्यभरातून एकूण ६५ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यापैकी ३४ स्पर्धकांची अंतिम निवड करण्यात आली.

या स्पर्धेचा विषय ‘चित्रपटांचे पोस्टर’ असा ठेवण्यात आला होता. स्पर्धकांना रांगोळी पूर्ण करण्यासाठी तब्बल २४ तासांचा अवधी देण्यात आला होता. राहुल कळंबटे यांनी या विषयाला अनुसरून मराठी चित्रपट ‘नटसम्राट’ मधील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे प्रभावी व्यक्तिचित्र रांगोळीच्या माध्यमातून साकारण्याचे ठरवले. अत्यंत बारकाईने आणि कलात्मक पद्धतीने हे चित्र साकारताना त्यांनी उपलब्ध २४ तासांपैकी तब्बल २३ तासांचा वेळ रांगोळी पूर्ण करण्यासाठी वापरला.

रांगोळीतील बारकावे, चित्रातील भावभावना, रंगसंगती आणि विषयाला दिलेली कलात्मक अभिव्यक्ती यामुळे राहुल कळंबटे यांच्या कलाकृतीने परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या कलाकृतीला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला.

स्पर्धेतील विजेत्यांमध्ये द्वितीय क्रमांक तृप्ती अहिरे (नाशिक), तर तृतीय क्रमांक विलास राहाटे (रत्नागिरी) यांनी पटकावला.

उत्तेजनार्थ पारितोषिके :
प्रमोद आर्वी (नाशिक), तन्मेश परब (गोवा), सुरेश छत्रे (कोल्हापूर) आणि साई पारकर (मालवण) यांची निवड करण्यात आली.

राज्यस्तरीय या स्पर्धेत विविध भागांतून आलेल्या कलाकारांनी आपल्या कल्पकतेचा आणि कलाकौशल्याचा सुंदर आविष्कार सादर केला. रांगोळीच्या माध्यमातून चित्रपट पोस्टर साकारण्याच्या अनोख्या संकल्पनेमुळे ही स्पर्धा विशेष आकर्षण ठरली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button