दापोली आगारात ई-बस चालकाचा विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न


दापोली : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दापोली आगारात ई-बस चालकाने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आगार परिसरातच हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. चालकाला तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित चालकाला ड्युटी मिळत नसल्याने तो काही दिवसांपासून नैराश्यात असल्याची चर्चा आहे. गणेशोत्सव जवळ आला असताना कामाबाबत निर्माण झालेल्या परिस्थितीतून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. मात्र, आत्महत्येच्या प्रयत्नामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

युनियन आणि स्थानिक राजकारणाचीही चर्चा

चालकाच्या ड्युटीच्या प्रश्नावरून दोन वेगवेगळ्या युनियन्समधील मतभेद तसेच स्थानिक राजकारणाचा या घटनेशी संबंध असल्याची चर्चा आगार परिसरात सुरू आहे. मात्र, या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

घटनेची माहिती मिळताच चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती आणि या घटनेमागील नेमके कारण याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

गणेशोत्सवाच्या काळात एसटी वाहतुकीवर मोठा ताण असताना चालकांच्या ड्युटी, कामाचे नियोजन आणि अंतर्गत वादांबाबत निर्माण होणाऱ्या प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button