एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळेपर्यंत माघार नाही; विलवडे प्रवासी संघटनेचा निर्धार२० सप्टेंबरला विलवडे स्थानकासमोर लाक्षणिक उपोषण;


लांजा तालुक्यातील विलवडे रेल्वे स्थानकावर मागणी केलेल्या एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा, यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी विलवडे रेल्वे स्थानक प्रवासी संघटना आक्रमक झाली आहे. रेल्वे प्रशासनाकडून मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, मागण्या मान्य होईपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार संघटनेच्या तातडीच्या बैठकीत करण्यात आला.

१९ ऑगस्ट रोजी विलवडे येथे झालेल्या बैठकीला लांजा तालुक्याच्या पूर्व भागासह राजापूर तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागणी केलेल्या सर्व एक्सप्रेस गाड्यांना थांबा देणे, दुसऱ्या प्लॅटफॉर्मची निर्मिती, सुसज्ज प्रतीक्षागृह, पथदीपांची व्यवस्था, स्थानकाकडे येणाऱ्या रस्त्याची सुधारणा, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठीच्या मार्गावरील अंधार दूर करणे, खेड-सावंतवाडी लोकल सुरू करणे, प्रवासी शेड तसेच स्थानक परिसरातील स्वच्छता आदी मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.

या मागण्यांसंदर्भात प्राथमिक स्वरूपात निवेदने देऊनही रेल्वे प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचा संघटनेचा आरोप आहे. काही वेळा प्रशासनाकडून चुकीची अथवा दिशाभूल करणारी माहिती दिली जात असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २० सप्टेंबर रोजी विलवडे रेल्वे स्थानकासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपोषणात प्रवासी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

मुंबई आणि ग्रामीण विलवडे रेल्वे प्रवासी संघटना संयुक्तपणे हे उपोषण यशस्वी करण्याची जबाबदारी घेणार आहे. त्यानंतर २३ ऑक्टोबर २०२६ रोजी बेलापूर येथील कोकण रेल्वे कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास किंवा रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास २३ नोव्हेंबर रोजी मोठ्या प्रमाणात रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

बैठकीत मुंबई संघटनेचे सल्लागार सुभाष लाड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी स्थानक प्रमुख सुबोध भाटकर यांना संघटनेच्या कार्यकारिणीतर्फे निवेदन देण्यात आले.

बैठकीत विलवडे रेल्वे प्रवासी संघटनेच्या नवीन कार्यकारिणी व सल्लागार मंडळाची निवड करण्यात आली. अमोल मारुती रेडीज यांची अध्यक्षपदी, सुरेश सिताराम शिगम, भास्कर श्रीपत खामकर आणि संतोष श्रीधर चव्हाण यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. दीपक तुकाराम तोरस्कर यांची सरचिटणीस, राजेश विठोबा बेर्डे यांची सहचिटणीस आणि अन्वर रखांगी यांची खजिनदार म्हणून निवड करण्यात आली.

सल्लागार मंडळात जगदीश राजापकर, दिलीपभाऊ पळसुलेदेसाई, आत्माराम चव्हाण, रवींद्र खामकर, डॉ. एस. व्ही. कदम, सत्यवान विष्णू खामकर, किशोर नारकर आदींचा समावेश करण्यात आला.

संघटनेच्या सदस्यपदी प्रकाश तानू राजपकर, युवराज मारुती हांदे, संजय आयरे, विजय मुरलीधर कदम, विवेक विजय काटकर, काशीराम राजाराम राजापकर, शशिकांत महादेव खामकर, अमर गणपत खामकर, अजय आत्माराम चव्हाण, दीपक दत्ताराम कानसे, संतोष कदम, अमोल दीपक कदम, मंगेश दत्ताराम जाधव, प्रतीक प्रकाश मांडवकर आणि उमेश वामन खामकर यांची निवड करण्यात आली.

मुंबई व ग्रामीण प्रवासी संघटनेच्या वतीने खासदार नारायणराव राणे, स्थानिक आमदार भैय्या ऊर्फ किरण सामंत, पालकमंत्री उदय सामंत, प्रमोद जठार, रवींद्र चव्हाण, श्रीराम कदम, नाईक आदी लोकप्रतिनिधींना यापूर्वी निवेदने देण्यात आल्याचे संघटनेने सांगितले. त्यांच्या सहकार्याने विलवडे रेल्वे स्थानकाच्या प्रलंबित मागण्या मार्गी लागतील, असा विश्वास नूतन कार्यकारिणी व सल्लागारांनी व्यक्त केला. आवश्यकतेनुसार या सर्व लोकप्रतिनिधींचा सल्ला घेतला जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button