
किल्ले रत्नदुर्गवर महादरवाजा संवर्धन मोहीम
कचरा व दारूच्या बाटल्यांचा पुन्हा सापळा : नागरिकांच्या बेफिकीरीवर प्रश्नचिन्ह
रत्नागिरी : ऐतिहासिक दुर्ग रत्नदुर्ग येथे महादरवाजा परिसरात गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, रत्नागिरी विभाग यांच्या वतीने रविवारी (१२ एप्रिल) व्यापक संवर्धन मोहीम राबविण्यात आली. प्रतिष्ठानचे मावळे व रणरागिणी यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या मोहिमेत किल्ल्यावरील स्वच्छता व जतनाचे काम करण्यात आले.
मात्र, या मोहिमेदरम्यान पुन्हा एकदा किल्ल्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर दारूच्या रिकाम्या बाटल्या व विविध प्रकारचा कचरा आढळून आला. स्वयंसेवकांनी हा कचरा गोळा करत स्वच्छता केली असली, तरीही ही बाब अत्यंत निंदनीय असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
गेल्या तीन वर्षांपासून गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान सातत्याने रत्नदुर्गावर संवर्धन कार्य करत असूनही, काही नागरिकांकडून किल्ल्याचे पावित्र्य व ऐतिहासिक महत्त्व जपले जात नसल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. वारंवार स्वच्छता मोहीम राबवूनही किल्ल्यावर मद्यपान करून कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच असल्याने संताप व्यक्त होत आहे.
“दुर्ग हे केवळ पर्यटनस्थळ नसून आपल्या इतिहासाचे जिवंत प्रतीक आहे. त्याचे जतन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,” असे मत प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. संबंधित प्रशासनानेही या प्रकारांकडे गांभीर्याने लक्ष देऊन कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, अशा प्रकारच्या मोहिमा पुढेही सुरू राहणार असून नागरिकांनीही जबाबदारीची जाणीव ठेवून किल्ल्यांचे पावित्र्य राखावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




