
बनावट क्रेडिट कार्ड योजनेच्या आमिषाने संगमेश्वरातील निवृत्ताची दीड लाखांची ऑनलाइन फसवणूक
संगमेश्वर : बँक ऑफ महाराष्ट्रच्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी क्रेडिट कार्ड मिळणार असल्याचे आमिष दाखवणाऱ्या बनावट ऑनलाइन जाहिरातीला भुलून संगमेश्वर तालुक्यातील एका ७६ वर्षीय निवृत्ताची १ लाख ५३ हजार ४५९ रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी देवरूख पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासार कोळवण येथील विलास नारायण कोळपे (वय ७६) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. ८ जुलैच्या रात्रीपासून ९ जुलैच्या पहाटेपर्यंत ही फसवणूक घडली.
कोळपे हे फेसबुक पाहत असताना त्यांना बँक ऑफ महाराष्ट्रच्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी विशेष क्रेडिट कार्ड योजनेची जाहिरात दिसली. त्यांनी त्यावरील ‘साईनअप’ पर्यायावर क्लिक करताच एका अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सअॅपवर संपर्क साधून स्वतःला बँकेचा प्रतिनिधी असल्याचे सांगितले.
विश्वास संपादन करत आरोपीने डेबिट कार्डचा १६ अंकी क्रमांक मागवून घेतला. त्यानंतर व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ कॉल करून चेहरा स्पष्ट दिसेल अशा पद्धतीने मोबाईल समोर धरण्यास सांगितले. या माध्यमातून मिळालेल्या माहितीचा गैरवापर करत आरोपीने फिर्यादींच्या पेन्शन खात्यातून ऑनलाइन व्यवहार करून १ लाख ५३ हजार ४५९ रुपये लंपास केले.
फसवणूक लक्षात आल्यानंतर कोळपे यांनी देवरूख पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून सायबर फसवणुकीचा पुढील तपास सुरू केला आहे.



