रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भाजपाचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी वैभव खेडेकर आग्रही!

संचालकपदासाठी पक्षाकडे दावेदारी; वाढीव चार जागांपैकी दोन जागा भाजपाला मिळाव्यात, वरिष्ठ नेतृत्वाकडे पाठपुरावा

खेड : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सहकार आणि राजकीय क्षेत्रात हालचालींना वेग आला आहे. बँकेच्या संचालक मंडळाची सदस्यसंख्या २१ वरून २५ करण्यात आल्याने राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांनी संचालकपदासाठी आपली दावेदारी मांडली असून, नव्याने वाढलेल्या चार जागांपैकी दोन जागा भाजपाला मिळाव्यात, अशी आग्रही भूमिका घेतली आहे.
ॲड. वैभव खेडेकर गेल्या दोन दशकांपासून जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदासाठी ते मागील दोन टर्मपासून प्रयत्नशील असल्याचे सांगितले जाते. यंदाच्या निवडणुकीत भाजपाला अधिक प्रतिनिधित्व मिळावे आणि आपल्याला संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळावी, यासाठी त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.
यासंदर्भात त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सिंधूरत्न समृद्धी योजनेचे उपाध्यक्ष डॉ. विनय नातू आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांच्याशी पत्रव्यवहार तसेच प्रत्यक्ष चर्चा केल्याचे स्पष्ट केले आहे. याशिवाय महायुतीतील समन्वयाच्या दृष्टीने शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्याशीही या विषयावर चर्चा झाल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळात सदस्यसंख्या वाढल्यामुळे नव्या राजकीय संधी निर्माण झाल्या आहेत. या वाढीव जागांपैकी दोन जागा भाजपाला मिळाल्यास जिल्ह्यात सहकार क्षेत्रातील पक्षाचे प्रतिनिधित्व अधिक प्रभावीपणे वाढवता येईल, अशी भूमिका ॲड. खेडेकर यांनी मांडली आहे.
महायुतीतील कोणत्याही घटक पक्षाच्या विद्यमान जागांवर दावा करण्याचा आपला हेतू नसून, नव्याने वाढलेल्या जागांमधून भाजपाला योग्य वाटा मिळावा, एवढीच आपली अपेक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महायुतीतील जागावाटपाच्या चर्चेत भाजपाच्या भूमिकेला कितपत महत्त्व मिळते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील सहकार क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाची संस्था मानली जाते. त्यामुळे या बँकेच्या संचालक मंडळातील प्रतिनिधित्वाला राजकीयदृष्ट्याही विशेष महत्त्व आहे. आगामी निवडणुकीत भाजपाचे प्रतिनिधित्व वाढविण्याबरोबरच स्वतःला संचालकपदाची संधी मिळावी, यासाठी ॲड. वैभव खेडेकर यांनी आपली बाजू वरिष्ठ नेतृत्वासमोर मांडली आहे.
महायुतीतील समन्वय आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयावर आपला विश्वास असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपाला वाढीव जागांपैकी किती जागा मिळतात आणि ॲड. वैभव खेडेकर यांच्या दावेदारीला पक्षाकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button