तळसरमध्ये विहिरीत पडलेल्या सांबराला वन विभागाकडून जीवदान


चिपळूण तालुक्यातील तळसर येथील कदमवाडी फाटा परिसरातील जुन्या विहिरीत पडलेल्या सांबराला वन विभागाच्या बचाव पथकाने सुरक्षितपणे बाहेर काढत जीवदान दिले. शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) घडलेल्या या घटनेत सांबराला कोणतीही इजा झाली नाही. त्याची प्रकृती सुस्थितीत असल्याची खात्री केल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

तळसर येथील कदमवाडी फाटा परिसरातील एका जुन्या विहिरीत सांबर पडल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने गावच्या पोलीस पाटलांना याची माहिती दिली. पोलीस पाटलांनी वन विभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती कळवली.

माहिती मिळताच चिपळूण वन विभागाचे वनरक्षक कृष्णा इरमले, वनरक्षक रमेश चिखलगुड आणि बचाव पथकातील अथर्व घाग यांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत अडकलेल्या सांबराची पाहणी केल्यानंतर त्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी पिंजरा विहिरीत सोडण्यात आला. सांबराला कोणतीही इजा होऊ नये, याची विशेष काळजी घेत बचावकार्य पूर्ण करण्यात आले.

सांबराची प्रकृती सुस्थितीत असल्याची खात्री केल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या बचावकार्यात तळसरचे पोलीस पाटील, कदम आणि स्थानिक ग्रामस्थांनीही सहकार्य केले.

हे बचावकार्य विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, सहायक वनसंरक्षक प्रियांका लगड, वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. खान आणि वनपाल एस. एस. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. वन विभागाच्या तत्परतेमुळे विहिरीत पडलेल्या सांबराचे प्राण वाचले. या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button