
गोवा मद्य तस्करी विरोधात परवानाधारकांचे लाक्षणिक उपोषण
रत्नागिरी : जिल्ह्यातील परमिट रूम परवानाधारक आणि सरकारमान्य देशी मद्य विक्री परवानाधारक यांच्या वतीने महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
५४ वर्षे व्यवसाय करून शासनाला महसूल मिळवून देत असताना गेली ५ वर्षे गोवा बनावटीच्या बोगस दारू तस्करीमुळे शासकीय महसूल पूर्णपणे बुडाला आहे. परवाना शुल्क (लायसन्स फी) प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे सरकारी परवानाधारक अडचणीत सापडले आहेत. गोवा बनावटीचे मद्य महाराष्ट्रातील मद्याच्या तुलनेत कैक पटीने स्वस्त मिळत असल्याने अनेक शाळांमधील विद्यार्थी खाऊला दिलेले पैसे एकत्र करून हे मद्य पीत आहेत आणि व्यसनाधीन होत आहेत. शाळांच्या जवळ मिळणाऱ्या गोव्याच्या दारू विरोधात मुख्याध्यापक तक्रार देत आहेत. तरीही प्रशासन कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीत.
परवानाधारकांनी आपल्या मागण्या मांडताना अवैध गोवा दारू विक्रीवर पोलीस खाते, एक्साईज, पोलीस पाटील, महिला बचत गट, होमगार्ड यांची संयुक्त कारवाई करून ज्या जागेत गोवा दारूचा साठा मिळेल त्या जागेच्या मालकावर गुन्हा दाखल करावा, ज्या अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात अवैध गोवा दारू विक्री आढळेल त्या अधिकाऱ्याला निलंबित करावे, अवैध गोवा दारू विक्रीत्यांचे आयकर विवरण पत्रावरील माहितीवरून उत्पन्न बाह्य संपत्तीची चौकशी करून मलमत्ता जप्त करण्यात यावी, तसेच अवैध गोवा दारू विक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सरकारमान्य मद्य विक्री संघटना प्रतिनिधी यांची कमिटी स्थापन करून दर महिना बैठक बोलावून आढावा घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन गोवा अवैध दारुवर कडक कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले.
यावेळी उपोषणकर्त्यांमध्ये जयेंद्र कोठारकर, अनिश भाटकर (राजापूर) ), संतोष जंगम (चिपळूण), स्वप्नील आंबोलकर (साटवली), राजीव कीर (रत्नागिरी), सुहास भोसले (चिपळूण), विजय कदम (चिपळूण), समीर तिवरेकर (रत्नागिरी), सुदीप चव्हाण (गुहागर), सचिन वाघधरे (लांजा), प्रशांत पवार (राजापूर), प्रशांत रमेश शिंदे (राजापूर), विनय गुरव (राजापूर), सचिन आखाडे (जैतापूर), सतीश घाडी (जैतापूर), सनी करंगुटकर (जैतापूर), रविंद्र गुरव (आडीवरे), संजय ओगले (राजापूर), संजय काणेकर (राजापूर) आदी उपस्थित होते.




