गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रयत्नांतून खेडच्या ऐतिहासिक खांबतळ्याचे रूपडे पालटणार!

खेड : खेड शहराची ऐतिहासिक ओळख असलेल्या खांबतळ्याच्या सुशोभीकरणाला आता आधुनिक मनोरंजनाची जोड मिळणार आहे. गृह राज्यमंत्री योगेश रामदास कदम यांच्या प्रयत्नांतून खांबतळ्याच्या सौंदर्यात आणखी भर पडणार असून, येथे संगीत कारंजे, आकर्षक लेझर शो यांसारखे नेत्रदीपक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामुळे खांबतळे केवळ शहरवासीयांच्या विरंगुळ्याचे ठिकाण न राहता पर्यटकांसाठीही एक महत्त्वाचे आकर्षण बनण्याची शक्यता आहे.
खेड शहरातील ऐतिहासिक खांबतळ्याचे रूपडे बदलण्यासाठी यापूर्वी माजी मंत्री रामदासभाई कदम यांनी सात कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला होता. या निधीतून सुशोभीकरणाची काही कामे मार्गी लागली असून, खांबतळ्याच्या विकासाला सुरुवात झाली होती. आता योगेश कदम यांच्या प्रयत्नांतून या विकासकामांना आधुनिक सुविधांची जोड मिळणार आहे.
प्रस्तावित सुशोभीकरणामध्ये आकर्षक संगीत कारंजे, रंगीबेरंगी प्रकाशझोतांसह लेझर शो, सुसज्ज पेव्हर वॉकवे, नागरिकांना बसण्यासाठी बाकडी, सुंदर उद्यान आणि हिरवळीची निर्मिती अशा विविध सुविधांचा समावेश असणार आहे. संगीताच्या तालावर नृत्य करणारी कारंजी आणि लेझर शोमुळे सायंकाळच्या वेळी खांबतळ्याचे सौंदर्य अधिक खुलणार आहे.
खांबतळ्याच्या समोरच स्वयंभू श्री शंकराचे मंदिर असल्याने या परिसराला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वही लाभले आहे. त्यामुळे सुशोभीकरणाच्या माध्यमातून धार्मिक पर्यटनासह कौटुंबिक पर्यटनालाही चालना मिळू शकते. ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि तरुणांसाठी हा परिसर विरंगुळ्याचे उत्तम ठिकाण ठरणार आहे.
खेड शहराच्या सौंदर्यात भर घालण्याबरोबरच नागरिकांना स्वच्छ, सुंदर आणि प्रसन्न वातावरण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. खांबतळ्याच्या विकासामुळे ‘सुंदर आणि स्वच्छ खेड’ या संकल्पनेलाही नवी झळाळी मिळणार असून, शहराच्या पर्यटनाधारित विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
ऐतिहासिक वारसा जपत आधुनिकतेची जोड देणारे खांबतळ्याचे हे नवे रूप खेडकरांसाठी अभिमानाची बाब ठरणार असून, या विकासकामांकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button