
कशेडी बोगद्याजवळ गॅसवाहू कंटेनर उलटला; चालक किरकोळ जखमी
कशेडी, दि. २३ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी बोगद्याजवळ गुरुवारी (२३ जुलै) सायंकाळी सुमारे ५.१५ वाजण्याच्या सुमारास गोव्याहून मुंबईकडे जाणारा गॅसवाहू कंटेनर अपघातग्रस्त झाला. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कंटेनर डिव्हायडरवर आदळून उलटला.
या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून सुदैवाने कंटेनरमधून गॅसची कोणतीही गळती झालेली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस व संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. अपघातानंतर सुरक्षेच्या दृष्टीने कशेडी बोगद्यातील वाहतूक काही काळ एकाच मार्गिकेतून सुरू ठेवण्यात आली. कशेडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक म्हस्के यांनी या घटनेला दुजोरा दिला.




