
पैशांच्या व्यवहारातून वाद; तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी : पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादातून एका तरुणाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात एका संशयितासह एका अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, हा प्रकार २० जुलै रोजी सकाळी ११.१५ ते २१ जुलै रोजी पहाटे २ वाजेपर्यंत रत्नागिरीतील नाचणे परिसर आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात घडल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सुरज मदन पाटील (वय ३६, सध्या रा. नाचणे, मूळ रा. काटी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादी यांनी चैताली जगदीश पाटील हिच्या वडिलांकडून चार लाख रुपये घेतले होते. ही रक्कम त्यांनी मार्च महिन्यात परत केली होती. मात्र, त्यावरील व्याजाच्या रकमेसंदर्भात दोन्ही बाजूंमध्ये मतभेद निर्माण झाल्याने वाद वाढल्याचे नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादी एक्साईज परीक्षेसाठी नवी मुंबईला गेले असताना ठाणे रेल्वे स्थानकावर चैताली पाटील, तिची आई आणि एका अनोळखी व्यक्तीची भेट झाली. त्यावेळी त्या अनोळखी व्यक्तीने त्यांना मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
यानंतर रत्नागिरीतील नाचणे येथील राहत्या घरी संदेश संतोष कोरडे (वय अंदाजे २४, सध्या रा. पनवेल, मूळ रा. बीड) हा एका अनोळखी व्यक्तीसह आला. त्याने २५ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप असून, पैसे देण्यास नकार दिल्यानंतर फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच सिलेंडरने पाठ व कमरेवर वार केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, मारहाणीचे चित्रीकरण मोबाईलवर करण्यात आले. त्यानंतर कपडे बदलण्यासाठी खोलीत गेलेल्या फिर्यादीला पुन्हा मारहाण करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तसेच रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात नेत असतानाही गळा दाबून आणि पोटात बुक्क्या मारल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी संदेश संतोष कोरडे आणि एका अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला असून, पुढील तपास सुरू आहे.




