
गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा; महाराष्ट्राच्या लोककलेचा देश-विदेशात व्यापक जागर
गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त महाराष्ट्राची समृद्ध लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा राज्याच्या सीमांपलीकडचे देश-विदेशातील रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ‘लोककलेतील श्रीगणेश’ या उपक्रमांतर्गत राज्यातील ३६ जिल्ह्यांसह देशातील विविध राज्यांत, नवी दिल्लीत आणि दुबईत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
देशातील विविध राज्यांमधील सादरीकरणे
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेला व्यापक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी देशातील विविध प्रमुख शहरांत खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे:
देहरादून (उत्तराखंड): १६ सप्टेंबर रोजी इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादमी येथे पारंपरिक ढोल-ताशा वादन.
जम्मू (जम्मू-काश्मीर): १८ सप्टेंबर रोजी पद्मश्री पद्मा सचदेव शासकीय महाविद्यालय सभागृहात लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य आणि गायन.
चेन्नई (तमिळनाडू): २० सप्टेंबर रोजी कृष्णा गणा सभा येथे नमन, गण, जाखडी, मंगळागौर, आदिवासी, धनगरी, कोळी नृत्य आणि जागरण-गोंधळ.
सिल्वासा (दादरा आणि नगर हवेली व दमण आणि दीव): २१ सप्टेंबर रोजी कला केंद्रात लेझीम, गण-गौळण, बाल्या नृत्य आणि शास्त्रीय नृत्य.
लखनऊ (उत्तर प्रदेश): २१ सप्टेंबर रोजी राय उमानाथ बली प्रेक्षागृहात गणेश वंदना, ओवी, मंगळागौर, गोंधळ, भजने आणि संगीतमय नृत्यनाट्य.
कोटा (राजस्थान) आणि अमरावती (आंध्र प्रदेश): २२ सप्टेंबर रोजी अनुक्रमे अहिल्याबाई होळकर सभागृह आणि वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे पारंपरिक लोककलांचे सादरीकरण.
कोलकाता (पश्चिम बंगाल): २२ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र निवासातील टिळक हॉलमध्ये स्तवन, गीतरामायण, कोळीगीते आणि देशभक्तीपर गीते.
हैदराबाद (तेलंगणा): २३ सप्टेंबर रोजी भारतीय विद्या भवन येथे ‘महा गणेशोत्सव’ अंतर्गत विशेष सांस्कृतिक कार्यक्रम.




