
रुग्णांच्या जिवाशीच खेळ? ‘मेयो’, ‘मेडिकल’मधील लाखाहून अधिक ताप, रक्तदाबाची औषधे ‘नापास’
गोरगरीब रुग्णांचा आधारवड मानल्या जाणाऱ्या ‘मेयो’ आणि ‘मेडिकल’मध्ये शासकीय पुरवठ्यांतर्गत आलेली ताप व रक्तदाबाची औषधे प्रयोगशाळा तपासणीत नापास ठरली आहेत.अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अहवालानंतर या औषधांबाबत खळबळ उडाली असून, दोन्ही औषधांच्या एक लाखांहून अधिक गोळ्यांचा वापर तातडीने थांबविण्याचे तसेच उपलब्ध साठा मागे घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ताप व अंगदुखीसाठी दिली जाणारी ‘पॅरासिटामॉल ५०० मि.ग्रॅ.’ आणि उच्च रक्तदाबावरील ‘टेलमिसार्टन ४० मि.ग्रॅ.’ या दोन्ही औषधांचे उत्पादन इंदूर येथील ‘क्युरेजा हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड’ने केले आहे.
ऑगस्ट महिन्यात ‘एफडीए’च्या पथकाने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (मेयो) या औषधांचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. १० सप्टेंबर रोजी तपासणीचा अहवाल प्राप्त झाला. त्यात दोन्ही औषधे प्रमाणित दर्जाची नसल्याचे स्पष्ट झाले. ‘पीटीटीसी-१०८’ या बॅचचे ‘पॅरासेव्ह ५००’ (पॅरासिटामॉल) या गोळ्यांचे बाह्य स्वरूप निर्धारित निकषांनुसार नसल्याचे तपासणीत आढळल्याने ही बॅच नापास ठरली. तर याच कंपनीच्या ‘सीएचपीएलटी ४१६’ या बॅचच्या ‘टेलमिसार्टन ४० मि.ग्रॅ.’ औषधाचा नमुना निर्धारित गुणवत्ता निकषांमध्ये अपयशी ठरला.शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा ही नेहमीची समस्या असताना उपलब्ध होणारा औषधसाठाही अशा प्रकारे गुणवत्ता तपासणीत अपयशी ठरत असल्याने संताप व्यक्त होत आहे. संबंधित कंपनीविरुद्ध कारवाई होणार का, तसेच तिला काळ्या यादीत टाकण्यात येणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
‘मेडिकल’मध्येही गोळ्यांच्या वापराला तत्काळ ब्रेक
मेयो रुग्णालयाकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) सुमारे ५० हजारांहून अधिक ‘पॅरासेव्ह ५००’ गोळ्यांचा साठा घेतला होता. अहवाल समोर येताच ‘मेडिकल’च्या औषधनिर्माणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अविनाश तुरणकर यांनी सर्व वॉर्ड आणि ओपीडी विभागांना या गोळ्यांचे वितरण त्वरित थांबवून उपलब्ध साठा परत करण्याचे लेखी निर्देश दिले आहेत.




