मुंबई विद्यापीठ आंतरविभागीय कबड्डी स्पर्धेतमुंबई सबर्बनची महिला, पुरुषांच्या गटात बाजी

रत्नागिरी, ता. ४ : मुंबई विद्यापीठाच्या आंतरविभागीय कबड्डी स्पर्धेत पुरुष आणि महिलांच्या गटात मुंबई सबर्बनने बाजी मारत विजेतेपद पटकावले. दोन्ही संघांना आकर्षक चषक आणि या संघांमधील खेळाडूंना सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले. कोकण विभागाला दोन्ही गटामध्ये उपविजेतेपद (द्वितीय क्रमांक) प्राप्त झाला. या दोन्ही संघांना गौरवण्यात आले.

या स्पर्धा दोन दिवस गोगटे -जोगळेकर महाविद्यालयाच्या बॅडमिंटन कोर्ट आणि जिल्हा क्रीडा संकुलच्या बॅडमिंटन कोर्ट येथे मॅटवर खेळवण्यात आल्या. यातील बहुतांशी सामने चुरशीचे झाले. या स्पर्धेत पात्रता फेरीतून आलेले महिला, पुरुषांचे आठ संघ सहभागी झाले. पुरुषांच्या गटामध्ये तृतीय क्रमांक ठाणे आणि चौथा क्रमांक मुंबई शहर संघाला मिळाला. तर महिलांच्या गटामध्ये तृतीय क्रमांक मुंबई शहर व चौथा क्रमांक ठाणे संघाला प्राप्त झाला.

बक्षीस वितरण समारंभाला गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाचे (स्वायत्त) प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे, अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुनील गोसावी, वसतीगृहाचे रेक्टर प्रा. निनाद तेंडुलकर, राष्ट्रीय प्रशिक्षक आणि महा कबड्डी लीग प्रशिक्षक संतोष शिर्के, चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह आणि रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सल्लागार विलास गुजर, राष्ट्रीय खेळाडू भूषण कुलकर्णी, क्रीडा शिक्षक कल्पेश बोटके, क्रीडा शिक्षिका लीना घाडीगावकर, डी.ए.व्ही. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.पांड्ये, मुंबई विद्यापीठ क्रीडा विभागाचे प्रसाद तळवडे, संतोष पेडणेकर, राष्ट्रीय प्रशिक्षक सुहास जोशी, जिल्हा क्रीडा अधिकारी सायली जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचे उत्तम नियोजन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने केले. याकरिता जिल्हा शासकीय रुग्णालय, ध्वनीव्यवस्था, कबड्डी पंच तसेच महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी खूप मेहनत घेतली. त्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन त्यांचे आभार मानण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button