महावितरणची सोमवारची देखभाल-दुरुस्ती शनिवार किंवा रविवारी करा


अरविंद लांजेकर आणि अजिम जैतापकर यांची उपअभियंत्यांकडे निवेदनाद्वारे मागणी; शासकीय कार्यालयांसह नागरिकांची गैरसोय टाळण्याची अपेक्षा
राजापूर : महावितरण कंपनीकडून दर सोमवारी वीजवाहिन्यांची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी वीजपुरवठा काही काळ बंद ठेवण्यात येतो. मात्र, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वीजपुरवठा खंडित होत असल्याने राजापूर शहरातील शासकीय, निमशासकीय कार्यालयांसह विविध महत्त्वाच्या आस्थापनांच्या कामकाजावर परिणाम होत आहे. त्यामुळे महावितरणने सोमवारऐवजी शनिवार किंवा रविवारी देखभाल व दुरुस्तीची कामे करावीत, अशी मागणी अरविंद अशोक लांजेकर आणि अजिम इब्राहीम जैतापकर यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी २ नोव्हेंबर २०२६ रोजी महावितरणच्या राजापूर उपविभाग १ च्या उपअभियंत्यांना निवेदन सादर केले आहे.
महावितरणकडून दर सोमवारी वीजवाहिन्यांची देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेतली जातात. त्यासाठी काही काळ वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो. मात्र, राजापूर हे तालुक्याचे प्रमुख ठिकाण असल्याने शहरातील विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या दैनंदिन कामकाजावर याचा परिणाम होतो. तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती, पोलीस ठाणे, बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग, विविध शासकीय कार्यालये तसेच रुग्णालये आणि शाळांच्या कामकाजात वीजपुरवठा खंडित झाल्याने अडथळे निर्माण होतात.
याचा सर्वाधिक फटका तालुक्याच्या ग्रामीण भागातून विविध शासकीय कामांसाठी राजापूर शहरात येणाऱ्या नागरिकांना बसतो. वीजपुरवठा बंद असल्याने अनेक कामे रखडतात. नागरिकांना कार्यालयात येऊनही कामे न झाल्याने पुन्हा हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे वेळ आणि पैशांचा अपव्यय होऊन सर्वसामान्यांची गैरसोय होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
महावितरणकडून करण्यात येणारी देखभाल व दुरुस्तीची कामे आवश्यक असली तरी ती नागरिकांच्या दैनंदिन कामकाजाला अडथळा ठरणार नाहीत, अशा दिवशी करण्यात यावीत. त्यासाठी दर सोमवारी होणारी देखभाल व दुरुस्तीची कामे शनिवार किंवा रविवारी निश्चित करून पूर्ण करावीत, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.
महावितरणने या मागणीचा सकारात्मक विचार करून वीजग्राहकांसह तालुक्यातील नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी अपेक्षा अरविंद अशोक लांजेकर आणि अजिम इब्राहीम जैतापकर यांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button