राजापूर शहरात बेदरकार दुचाकीस्वाराची शाळकरी मुलाला जोरदार धडक

ट्रिपल सीट प्रवासामुळे अपघात; व्यापारी विनोद पवार यांच्या प्रसंगावधानामुळे मुलाला वेळीच उपचार

राजापूर : राजापूर शहरातील जवाहर चौकाकडून जकात नाक्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर बेदरकारपणे ट्रिपल सीट दुचाकी चालवणाऱ्या चालकाने सुपर बाजारजवळ एका शाळकरी मुलाला जोरदार धडक दिली. या अपघातात मुलगा गंभीर जखमी होऊन रस्त्यावरच बेशुद्ध पडला. मात्र, परिसरातील व्यापारी विनोद पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, जवाहर चौकाकडून जकात नाक्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरून एक दुचाकीस्वार तिघांना घेऊन भरधाव वेगाने जात होता. यावेळी सुपर बाजारजवळ त्याने एका शाळकरी मुलाला जोरदार धडक दिली. धडकेमुळे मुलगा रस्त्यावर फेकला जाऊन बेशुद्ध झाला. अचानक घडलेल्या या अपघातामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.
अपघाताची घटना लक्षात येताच जवळच असलेले व्यापारी विनोद पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मुलाला शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यानंतर वेळ न दवडता त्याला राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वेळीच मदत मिळाल्याने संभाव्य अनर्थ टळला. उपचारानंतर मुलाची प्रकृती स्थिर झाली असून त्याला घरी पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, राजापूर शहरातील मुख्य रस्त्यांवर काही दुचाकीस्वारांकडून बेदरकारपणे वाहन चालविणे, ट्रिपल सीट प्रवास करणे आणि धूमस्टाईलने वेगाने वाहने पळविण्याचे प्रकार वाढत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. अशा वाहनचालकांमुळे पादचारी, शाळकरी मुले आणि अन्य वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि बेदरकारपणे वाहने चालविणाऱ्या दुचाकीस्वारांवर राजापूर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, शहरातील प्रमुख चौक आणि गर्दीच्या ठिकाणी वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावी करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button