दुष्काळग्रस्त राजापूर तालुक्यात जलसंधारणासाठी पोलिसांचे श्रमदान!

राजापूर पोलिसांनी मौजे डोंगर येथे ग्रामस्थांच्या सहकार्याने बांधला वनराई बंधारा; पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुढाकार



राजापूर : राजापूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विविध स्तरांतून प्रयत्न सुरू आहेत. याच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून राजापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी मौजे डोंगर येथे श्रमदान करत ग्रामस्थांच्या सहकार्याने वनराई बंधाऱ्याचे बांधकाम केले. पोलिसांच्या या उपक्रमातून जलसंधारणाचा संदेश देतानाच पाण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
डोंगर येथे आयोजित या श्रमदान उपक्रमात पोलीस अधिकारी व अंमलदारांसह ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस पाटील आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सर्वांनी एकत्रितपणे श्रमदान करून वनराई बंधारा उभारला. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरविण्यास तसेच परिसरातील पाणीसाठा वाढविण्यास या बंधाऱ्याची मदत होणार आहे.
या वेळी डोंगर गावच्या सरपंच सौ. जुबेदाबी मस्तान, ग्रामसेविका सौ. किनरे, ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ गुरव, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पुजारी उन्हाळे, संदीप पवार, डोंगरचे पोलीस पाटील दीपक डोंगरकर, मुसलमानवाडीचे पोलीस पाटील सचिन कदम, दत्तवाडीचे पोलीस पाटील किरण कामतेकर, चौकेचे पोलीस पाटील तांबे, दोनीवडेच्या पोलीस पाटील सौ. करंगुटकर, विखारे गोठणेचे पोलीस पाटील संजय पावसकर उपस्थित होते.
तसेच गावातील शामराव कदम, शंकर भुते, संदेश कदम, वसंत देवळेकर यांच्यासह अन्य ग्रामस्थांनीही श्रमदानात सहभाग घेतला.
पोलिसांनी केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्यापुरते मर्यादित न राहता सामाजिक उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग नोंदविल्याने या उपक्रमाचे कौतुक होत आहे. प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्या सामूहिक प्रयत्नांतून जलसंधारणाची चळवळ अधिक बळकट होण्यास अशा उपक्रमांचा निश्चितच हातभार लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button