
तिसे खुर्द येथे बिबट्याचा हल्ला; म्हशीच्या रेडीचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
भक्ष्याच्या शोधात बिबट्याचा मानवी वस्तीत वावर; वनविभागाच्या निष्क्रियतेबाबत ग्रामस्थांमधून संताप
खेड : तालुक्यातील तिसे खुर्द येथे बिबट्याने हल्ला करून म्हशीच्या रेडीला ठार केल्याची घटना घडली आहे. येथील श्री. उमेश धोंडू खेडेकर यांच्या मालकीच्या म्हशीच्या रेडीवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात रेडीचा मृत्यू झाल्याने पशुपालकाचे आर्थिक नुकसान झाले असून परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून भक्ष्याच्या शोधात बिबट्या मानवी वस्तीत शिरत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. पाळीव जनावरांवर हल्ले होण्याचे प्रकार वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना तसेच जनावरे सांभाळताना ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दरम्यान, अशा घटना वारंवार घडत असतानाही वनविभागाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याची नाराजी ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करावी, बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि आवश्यकतेनुसार पिंजरा लावून त्याला जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. वनविभागाने आणखी एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची वाट न पाहता तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



