
वन्यप्राण्यांच्या उपद्रवावर तोडगा काढण्यासाठी कृषि विद्यापीठाचा पुढाकार
दापोलीः- कोकणातील शेतीसमोर वन्यप्राण्यांच्या उपद्रवाचे मोठे संकट उभे राहिले असून रानडुक्कर, माकडांसह विविध वन्यप्राण्यांकडून पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान होत आहे. वारंवार होणाऱ्या या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाले असून शेती करावी की सोडून द्यावी, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. या गंभीर समस्येवर केवळ तात्पुरते उपाय न करता कायमस्वरूपी आणि प्रभावी उपाययोजना निश्चित करण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. वन्यप्राण्यांच्या उपद्रवाबाबत सर्व संबंधित घटकांना एकत्र आणून विशेष चर्चासत्र आयोजित करण्याची मागणी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयाने दापोलीच्या विभागीय वनाधिकाऱ्यांकडे केली आहे.
यासंदर्भात विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयाने विभागीय वनाधिकारी, दापोली यांना पत्र पाठविले आहे. संतोष महाजन यांनी 11 ऑक्टोबर 2026 रोजी केलेल्या पत्रव्यवहाराच्या अनुषंगाने हे पत्र देण्यात आले आहे. वन्यप्राण्यांमुळे शेतीपिकांचे होणारे नुकसान तसेच वाढता मानव-वन्यजीव संघर्ष याबाबत योग्य उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
कोकण विभागातील शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतीपिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान सहन करावे लागत आहे. या समस्येवर प्रभावी आणि दीर्घकालीन उपाययोजना निश्चित करणे आवश्यक असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. वन्यप्राण्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, वन्यजीव संरक्षणविषयक कायदेशीर तरतुदी, नुकसानभरपाईसंबंधी कार्यपध्दती आणि मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी करावयाच्या उपायांवर सविस्तर चर्चा होणे गरजेचे असल्याचे पत्रात म्हटले आहे.
या चर्चासत्रासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथील संबंधित विषयांतील शास्त्रज्ञ, विस्तार कार्याशी संबंधित अधिकारी, वन विभागाचे अधिकारी तसेच प्रगतशील शेतकरी आणि वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे प्रत्यक्ष नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना निमंत्रित करण्याची सूचना करण्यात आली आहे. वनविभागाचे अधिकारी, कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ आणि शेतकरी यांच्या प्रत्यक्ष अनुभवांच्या आधारे वन्यप्राण्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी व्यवहार्य आणि परिणामकारक उपाययोजना निश्चित करण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. केवळ कागदोपत्री उपाय न ठरविता प्रत्यक्ष शेतकऱ्यांना उपयोगी पडतील. अशा उपायांवर या चर्चासत्रात भर देण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे
चर्चासत्रामध्ये झालेल्या विचारविनिमयानंतर निश्चित करण्यात आलेल्या उपाययोजना आणि शिफारशींचा सविस्तर अहवाल विभागीय वनाधिकारी कार्यालयाला उपलब्ध करून देण्याची तयारीही विद्यापीठाने दर्शविली आहे. त्यामुळे या चर्चासत्रातून वन्यप्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी कोणते ठोस पर्याय पुढे येतात, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे. वन्यप्राण्यांकडून होणारे पीक नुकसान, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय, नुकसानभरपाई मिळविताना येणाऱ्या अडचणी आणि वन्यजीवांचे संरक्षण या सर्व बाबींचा समतोल साधणारी उपाययोजना तयार होणे काळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर कृषि विद्यापीठाने घेतलेला पुढाकार कोकणातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे. आता विभागीय वनाधिकारी कार्यालय या प्रस्तावाला कसा प्रतिसाद देते आणि चर्चासत्राचे आयोजन कधी होते, याची प्रतिक्षा आहे.



