
सिंधुदुर्ग-चिपी ते नवी मुंबई विमानसेवा आता आठवड्यातील सातही दिवस सुरू
पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश
सिंधुदुर्ग दि.३ :- सिंधुदुर्ग चिपी ते नवी मुंबई दरम्यानची विमानसेवा लवकरच सुरू होणार असून, ही सेवा आठवड्यातील सातही दिवस उपलब्ध असणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग आणि नवी मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे ही विमानसेवा सुरु होतं आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.
दीपक कपूर यांनी आपल्या ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग ते नवी मुंबईदरम्यान दररोज विमानसेवा सुरू राहणार आहे.
हे विमान नवी मुंबई येथून सकाळी ७:५५ वाजता उड्डाण करेल आणि सकाळी ९:०५ वाजता सिंधुदुर्ग येथे पोहोचेल. त्यानंतर सिंधुदुर्ग येथून सकाळी ९:२५ वाजता उड्डाण करून सकाळी १०:३५ वाजता नवी मुंबई येथे उतरेल. अशा प्रकारे या विमानसेवेचे नियमित वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.
या विमानसेवेमुळे सिंधुदुर्ग-नवी मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आठवड्यातील सातही दिवस विमानप्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
या सेवेमुळे प्रवासाचा वेळ वाचण्यासोबतच प्रवास अधिक सुलभ आणि सोयीस्कर होणार असून, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन, व्यापार आणि आर्थिक विकासालाही या विमानसेवेमुळे चालना मिळण्यास मदत होणार आहे.



