सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ साठी “राज्यस्तरीय लोगो स्पर्धा’ ; कोकणच्या वैभवाला कलेचा साज देण्याची सुवर्णसंधी


रत्नागिरी, दि. ३ ): रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची नवी दिशा ठरणाऱ्या महत्वाकांक्षी ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ ची ओळख आता अधिक ठळक होणार आहे. या योजनेची स्वतंत्र, अर्थपूर्ण आणि जिल्ह्याची वैशिष्ट्ये अधोरेखित करणारी अधिकृत ओळख (लोगो) निश्चित करण्यासाठी ‘राज्यस्तरीय लोगो’ डिझाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील आणि राज्यातील कल्पक नागरिक, विद्यार्थी, कलाकार व ग्राफिक डिझायनर्सनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.
नवीन लोगोमध्ये रत्नागिरीची खरी ओळख असणाऱ्या वैशिष्ट्यांचा सर्जनशील संगम अपेक्षित आहे. यामध्ये प्रामुख्याने:
*अथांग अरबी समुद्र व विपुल सागरी संपदा
*सह्याद्रीच्या रांगा आणि समृद्ध निसर्ग
*जागतिक कीर्तीचा हापूस आंबा व शेती-बागायती
*पारंपरिक व आधुनिक मत्स्यव्यवसाय
*पर्यटन, समृद्ध कोकणी संस्कृती व वारसा
*स्थानिक उद्योजकता, रोजगार, शाश्वत विकास आणि प्रगती
१० हजार रुपयांचे रोख पारितोषिक
स्पर्धेतील सर्वोत्तम लोगोची निवड करून प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला १० हजार रुपये रोख पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. जिल्ह्याची ओळख, योजनेची संकल्पना आणि नाविन्यता या निकषांवर १०० गुणांच्या आधारे तज्ज्ञ समितीकडून निष्पक्ष मूल्यांकन केले जाईल.
स्पर्धेच्या महत्त्वाच्या अटी व नियम
*एआय (AI) वापरावर पूर्ण बंदी: लोगो तयार करण्यासाठी कोणत्याही कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) साधनांचा वापर केल्यास अथवा नक्कल (Plagiarism) आढळल्यास ती प्रवेशिका तत्काळ बाद केली जाईल.
*मौलिकता: लोगो पूर्णपणे स्वयंनिर्मित आणि रंगीत स्वरूपात स्पष्ट दिसणारा असावा.
*उपयुक्तता: सोशल मीडिया, संकेतस्थळ, पत्रव्यवहार, फलक, बॅनर अशा सर्व माध्यमांवर लहान-मोठ्या आकारात वापरता येण्याजोगा असावा.
*प्रतिबंध: राजकीय चिन्हे, व्यक्तींचे फोटो, धार्मिक अथवा आक्षेपार्ह बाबी, तसेच भारत/महाराष्ट्र शासनाची अधिकृत राजमुद्रा किंवा तिची नक्कल लोगोमध्ये अजिबात नसावी.
*हक्क: निवडलेल्या लोगोचे सर्व कॉपीराइट्स आणि बौद्धिक संपदा अधिकार ‘सिंधुरत्न कार्यकारी समिती, रत्नागिरी’ यांच्याकडे राखीव राहतील. समितीचा निर्णय अंतिम असेल.
*प्रवेशिका सादर करण्याचे स्वरूप*
लोगो JPG किंवा PNG स्वरूपात असावा (शक्य असल्यास Vector, CorelDRAW, EPS किंवा PDF फाईल जोडावी). सोबत डिझाइनमागील विचार स्पष्ट करणारी १०० ते १५० शब्दांची संकल्पना (Concept Note) जोडणे अनिवार्य आहे.
अंतिम मुदत आणि संपर्क
इच्छुक स्पर्धकांनी आपले प्रस्ताव ३० नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत खालील ई-मेलवर किंवा प्रत्यक्ष पत्त्यावर पाठवावेत:
*ई-मेल: dporatnagiri@gmail.com
*पत्ता: जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, दुसरा मजला, मुख्य प्रशासकीय इमारत, रत्नागिरी – ४१५ ६१२.
आपल्या कल्पकतेने आणि कुंचल्याच्या जादूने रत्नागिरीच्या विकासाची नवी ओळख साकारण्यासाठी कलाकारांना ही एक उत्तम संधी चालून आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button